शरद पवार राष्ट्रपती? डाव्यांची फिल्डिंग

0

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या उमेदवाराविरूद्ध तगडा उमेदवार म्हणून विरोधी पक्षांकडून शरद पवार यांचे नाव पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरूवातील संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांच्या नावावर विचार सुरू होता. मात्र, त्यांचे नाव आता अचानक मागे पडले आहे. देशाच्या राष्ट्रपतीपदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्ती बसविली जाणार असल्याच्या चर्चेनंतर विरोधी पक्ष सावध झाले आहेत. यातूनच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात व सीताराम येच्युरी यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली.

जादा मते खेचण्याची क्षमता
डाव्या पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीविषयी चर्चा झाल्याचे समजते. ‘शरद पवार हे सर्वाधिक स्वीकारार्ह नाव असून त्यांच्याकडे अतिरिक्त मते खेचण्याची जबरदस्त क्षमता आहे. पवार निवडणुकीत उतरल्यास ते एनडीएची मतेही फोडू शकतात. मराठी माणूस म्हणून शिवसेना त्यांच्या पारड्यात वजन टाकू शकते, असाही डाव्यांचा होरा आहे. सध्याचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी ही डाव्यांची राष्ट्रपतीपदासाठीची पहिली पसंत होती. मात्र, त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यामुळं डावे पक्ष पवारांकडं वळले आहेत.

पवारांची पसंती नजमा हेपतुल्ला यांना
डावे पक्ष हे शरद पवारांना गळ घालत असले तरी पवारांनी स्वत: मात्र मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांचे नाव पुढे केले आहे. विरोधी पक्षांनी नजमांच्या नावाला संमती द्यावी, असा त्याचा प्रयत्न आहे. तसे झाल्यास सरकारशी चर्चा करण्याचीही त्यांची तयारी असल्याचे समजते. तब्बल 16 वर्षे राज्यसभेच्या उपसभापती राहिलेल्या नजमा हेपतुल्ला शरद पवारांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. सध्या त्या भाजपमध्ये असल्यानं मोदी सरकार त्यांचे नाव टाळू शकणार नाही, असे राष्ट्रवादीला वाटते.