शरद यादव काँग्रेसमध्ये जाणार?

0

नवी दिल्ली : भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी विजय मिळविल्यानंतर जनता दल (संयुक्त)चे नेते शरद यादव यांनी बुधवारी टिट्व करून पटेलांचे अभिनंदन केले. यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, यादव काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

पटेलांचा हा विजय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर नितीश कुमार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते शरद यादव नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर शरद यादव यांनी पटेल यांचे केलेले अभिनंदन महत्वाचे मानले जात आहे. यादव यांनी ट्विटसोबत अहमद पटेल आणि त्यांचा फोटोही शेअर केला. मोठ्या अडथळ्यांचा सामना करून राज्यसभेच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल तुमचे अभिनंदन. आपल्या भावी कारकिर्दीतही असेच यश मिळो, असा संदेश यादव यांनी ट्विटमध्ये लिहला होता. त्यामुळे आता शरद यादव काँग्रेसमध्ये जाण्यास उत्सुक असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.