पाटणा : मुलीच्या अब्रुपेक्षा मताची किंमत जास्त महत्त्वाची असते, असे वादग्रस्त विधान संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी केल्याने गहजब उडाला आहे. सध्या पैशाच्या आधारे मताचीही खरेदी विक्री होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. येथे मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात शरद यादव बोलत होते. मतदानाचे महत्त्व ते उपस्थितांना सांगत होते. मात्र, मतदान किती महत्त्वाचे आहे, हे सांगताना त्यांची जीभ एकदमच घसरली.
.. तर देशाची अब्रु जाईल!
शरद यादव म्हणाले, लोकांनी मतदानाचे महत्त्व समजून घेण्याची गरज आहे. मुलीच्या अब्रुपेक्षा मताची किंमत जास्त महत्त्वाची आहे. एकदा मुलीची अब्रु गेली, की गाव आणि विभागाची अब्रु जाईल. पण जर एकदा मत विकले गेले तर संपूर्ण देशाची अब्रु जाईल. तुमचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असे यादव यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात पैशांअभावी जदयू निवडणूक लढवण्यात असमर्थ ठरत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. राजकारणात पैशांचा कसा बोलबाला आहे हेही त्यांनी दक्षिणेतील राज्यांचा दाखला देत सांगितले. मात्र, त्यांनी केलेल्या विधानांमुळे सर्वांनाच धक्का बसला.
महिला संघटना खवळल्या
शरद यादव यांच्या विधानावर देशभरातील महिला संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, यादव यांनी माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. मुलींसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे यादव यांना नोटीस बजावणार असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले.