शरद यादव यांनी अखेर सोडले मौन; नितीश कुमारांवर सोडले टीकास्त्र

0

नवी दिल्ली । बिहारातील राजकीय घडामोडींबाबत आजवर मौन बाळगून असणारे जेडीयू पक्षाचे वरिष्ठ नेते शरद यादव यांनी सोमवारी अखेर मनातील खदखद व्यक्त करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. जनतेने यासाठी बहुमत दिले नव्हते याची आठवण त्यांनी नितीश कुमारांना करून दिली. तसेच त्यांच्या निर्णयाशी आपण अहसमत असल्याचे त्यांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे सांगितले.

जनतेचा विश्‍वासघात
सोमवारी संसदेच्या परिसरात शरद यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बिहारमध्ये घडलेला प्रकार हा दुर्दैवी असून त्यामुळे जनमताचा अनादर झाला आहे. नितीश कुमार यांनी जो निर्णय घेतला त्याच्याशी मी सहमत नाही. हे खूपच दुर्दैवी आहे. बिहारच्या जनतेने यासाठी आम्हाला सत्ता दिली नव्हती, असे यादव यांनी म्हटले. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असणार्‍या घडामोडींवर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य करत आपली नाराजी व्यक्त केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

चर्चेला उधाण
नितीश कुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर जेडीयूचे राज्यसभा सदस्य अन्वर अली यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी मौन बाळगले होते. येत्या काही दिवसांत शरद यादव हे केंद्रीय मंत्री मंडळात सहभागी होतील अशी शक्यतादेखील असल्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, यादव यांनी राहूल गांधी यांची भेट घेतली तर लालूंशी दूरध्वनीवर बोलणे केल्याचेही वृत्त समोर आले होते. यातच आता त्यांनी थेट नितीश यांच्यावरच हल्लाबोल केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

वादळापुर्वीची शांतता ?
शरद यादव हे मुकाटपणे केंद्रीय मंत्रीपद स्वीकारतील अशी अपेक्षा असतांना त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत मिळाले आहेत. बिहारमध्ये जेडीयूचे 11 यादव तर 8 मुस्लीम आमदार असून त्यांच्याही नितीश यांच्या निर्णयाने अस्वस्थता असल्याचे वृत्त आहे. नितीश यांनी विश्‍वासमत जिंकले असले तरी भविष्यात अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे एकंदरीतच बिहारच्या राजकीय वर्तुळात वादळापुर्वीची शांतता असल्याची असल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत आहे.

…डोक्याला बंदूक लाऊ का?
तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीदेखील बिहार प्रकरणावर लखनऊ येथील पत्रकार परिषदेत भाष्य केले. “बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय सर्वस्वी नितीशकुमार यांचा होता. त्यांना भ्रष्ट लालूंची साथ नको होती. त्यांचीच तशी इच्छा असेल तर आम्ही बंदूक दाखवून त्यांना लालूंसोबत नांदायला लावायचं का?; असा सवाल त्यांनी केला. यासोबत त्यांनी आपण विरोधी पक्षांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपांनाही नाकारले.