शरीफ यांची कारकीर्द संपुष्टात

0

पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचा दणका

इस्लामाबाद : नवाझ शरीफ यांच्याविरोधात पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, एखादी व्यक्ती घटनेच्या कलम 62 (1)(एफ) नुसार दोषी असेल तर ती व्यक्ती आयुष्यभर दोषीच राहणार. याचा अर्थ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आता त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणत्याही सार्वजनिक पदाचा कार्यभार सांभाळू शकत नाहीत.

जनतेला चांगल्या नेत्यांची गरज
मागील सुनावणीत पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, घटनेच्या अनुच्छेद 62 आणि 63 नुसार दोषी ठरविण्यात आलेली कोणतीही व्यक्ती राजकीय पक्षाचे प्रमुख पद स्वीकारु शकत नाही. यानंतर नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पार्टीच्या अध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सर्वसंमतीने हा निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश साकिब निसार म्हणाले, जनतेला चांगली प्रतिमा असलेल्या नेत्यांची गरज आहे.

पंतप्रधान पदावर राहण्यास अपात्र
गेल्यावर्षी पनामा पेपर लीक प्रकरणी पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने नवाझ शरीफ यांना पंतप्रधान पदावर राहण्यास अपात्र ठरविले होते. तसेच शरीफ यांच्याबरोबर पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनाही अपात्र ठरवले होते. या प्रकरणात पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची देशा बाहेर मोठी संपत्ती असल्याचे आरोप आहेत. काही वर्षांपूर्वी पनामा पेपर लिक झाल्याची घटना घडली होती. त्यात अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय नेत्यांची देशा बाहेर मोठी संपत्ती असल्याचे उघडकीस आले होते. त्यात नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचेदेखील नाव सामील आहे.