जळगाव- महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील दोन अधिकार्यांकडून एका निराधार महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्काधायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पिडीत महिलेने निवेदनाव्दारे तक्रार केली आहे. यावेळी पिडीतेसह काही सामाजिक कार्यकत्यांनी आज (ता.28) आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांची भेट घेवून त्या दोन्ही अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील दोन अधिकार्यांकडून एका महिला कर्मचार्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. ही महिला महापालिकेच्या आरोग्य विभागात कर्मचारी म्हणून कामाला आहे. या निराधार महिलेकडे त्यांच्याच विभागातील वरीष्ठ दोन अधिकार्यांकडून शरिर सुखाची मागणी करण्यात आली. या गोष्टीला महिलेने विरोध केला असता, संबधित दोघांकडून महिलेला मानसिक त्रास देण्यात येत आहे. तसेच बदली करण्याची व अतिरिक्त कामे लावण्याची धमकी संबधितांकडून महिलेला देण्यात येत असल्याचे पीडीत महिलेने आयुक्तांना सांगितले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, शेतकरी सुकाणू समितीचे सचिन धांडे, सामाजिक कार्यकर्ते विनोद देशमुख, मुकुंद सपकाळे, मिलींद सोनवणे, अनिल सोनवणे आदी उपस्थित होते.
चुकीला माफी नाही, दोषींवर कारवाई होणार
तक्रारदार महिलेने आयुक्तांची भेट घेवून घडलेल्या प्रकाराबाबत महिती दिली. संबधितांकडून कामावर हजर राहून देखील गैर हजर दाखवू असे धमकाविण्यात येते व वारंवार बदलीची धमकी दिली जात असल्याचेही महिलेने सांगितले. आयुक्त टेकाळे यांनी महिलेची बाजू ऐकून घेत महापालिका अंतर्गत महिला कर्मचारी लैगिंक तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून चौकशी करुन न्याय देण्याची ग्वाही दिली. तसेच चुकीला माफी नाही, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल व चौकशीत दोषी आढळणार्यांची गय केली जाणार नाही असे आयुक्त डॉ. टेकाळे यांनी सांगितले.