लंडन । अमेरिकेच्या टोरी बोवीने जागतिक मैदानी स्पर्धेत महिलांची 100 मीटरची शर्यत जिंकून मागील वर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये हुकलेल्या सुवर्णपदकाची भरपाई केली. रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणार्या एलेना थॉमसन यावेळी पाचव्या क्रमांकावर राहिली.रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची मानकरी ठरलेल्या 26 वर्षीय बोवीने निर्णायक टप्प्यात आयवरी कॉस्टच्या मारी जोसी टा लाऊला मागे टाकत सुवर्णपदक जिंकले.
शर्यत पूर्ण करताच बोवी ट्रॅकवर पडली. सुरूवातीला टा लाऊने विजयाचा आनंद साजरा करण्यास सुरूवात केली. पण, स्कोअर बोर्डवर बोवीला विजेती म्हणून घोषीत करण्यात आले. बोवीने ही शर्यत 10.85 सेकंदात पूर्ण केली. तर, टा लाऊ 10.86 सेकंद अशा कामगिरीसह दुसर्या स्थानावर राहिली. नेदरलँडच्या डेफ्ने स्किपर्सने 10.96 सेकंद अशा वेळेसह कांस्यपदक जिंकले.
महिलांच्या मॅरेथॉन स्पर्धेत बहरीनची रोझ चेलिमा विजेती ठरली. मूळची केनियाची असलेल्या चेलिमोने शेवटच्या एक किलोमीटरमध्ये धावण्याचा वेग वाढवत दोन तास 27 मिनिटे 11 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. केनियाची एडना आंगरींगवॉनी किप्लागाटला शर्यतीत हॅट्ट्रिक साधता आली नाही.