चेन्नई : मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगल्यानंतर अन्ना द्रमुक पक्षाच्या महासचिव व्ही. के. शशिकला यांनी बुधवारी पुन्हा आत्मसमर्पण करण्यासाठी थोडा वेळ देण्यात यावा, अशी सर्वोच्च न्यायालयापुढे केलेली याचिका न्यायपीठाने फेटाळून लावली. ‘तातडीने कारागृहात जा, या आमच्या म्हणण्याचा अर्थ कळतो का?’ अशा शब्दांत न्यायालयाने शशिकला यांना सुनावले. न्यायालयाच्या या दणक्यानंतर त्यांनी तातडीने बेंगळुरू कारागृह गाठत स्वतःचे आत्मसमर्पण केले. तत्पूर्वी त्यांनी चेन्नई येथील स्व. जयललिता यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी काही तरी पुटपुटत समाधीवर एक जोरदार थापदेखील हाणली. समाधीला अशाप्रकारे जोरात थाप मारण्याचे कारण काय? याबाबत तामिळनाडूत चर्चा सुरु होती. स्व. जयललिता यांचा आत्मा सद्या कपटी शशिकलांवर सूड उगवित असल्याची चर्चा जोरात सुरु असताना शशिकला यांच्या या कृत्याने त्याला बळ मिळाल्याचीही चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, आमदारांना डांबून ठेवल्याप्रकरणी शशिकला यांच्यासह पक्षाचे नवनिर्वाचित विधिमंडळ नेते के. पलानीस्वामी यांच्याविरोधात कुवाथूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मदुराई (दक्षिण) मतदारसंघाचे आमदार एस. एस. सरवनन यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पक्षाच्या आमदारांचे अपहरण करून त्यांना एका रिसॉर्टमध्ये बेकायदेशीररित्या बंदीस्त करून ठेवण्याचा आरोप या दोघांवर करण्यात आलेला आहे.
शशिकलांना वेळ देण्यास न्यायालयाचा नकार
व्ही. के. शशिकला यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून तातडीने कारागृहात जावे यासाठी चेन्नई पोलिसांनी काल त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दबाव आणला होता. त्यानुसार, बुधवारी त्यांनी स्व. जयललिता यांचे पोएस गार्डन हे निवासस्थान सोडून बेंगळुरू कारागृहाकडे जाण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल करत, आत्मसमर्पण करण्यासाठी थोडा अवधी देण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली. तथापि, न्यायालयाने त्यांना फटकारत, तातडीने कारागृहात जा, या आमच्या म्हणण्याचा अर्थ कळतो का? आम्ही दिलेल्या निर्णयात एक ओळीचाही बदल करण्याचा आमचा विचार नाही, असेही न्यायालयाने फटकारले. त्यानंतर मात्र शशिकला या कारागृहात जाण्यासाठी सज्ज झाल्यात. त्यांनी स्व. जयललिता यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. गुलाबपुष्प वाहिल्यानंतर त्यांनी काही वेळ हात जोडले व नंतर त्यांनी खाली वाहून जोरात एक थापड जयललितांच्या समाधीवर हाणली व ओठाने काही तरी पुटपुटत असल्याच्या त्या दिसल्या. त्यानंतर त्यांनी एमजीआर यांच्या समाधीचेही दर्शन घेतले व त्या सरळ वाहनाद्वारे बेंगळुरूरकडे रवाना झाल्यात. तेथे त्यांनी कनिष्ठ न्यायालयापुढे शरणागती पत्कारली. न्यायालयाने त्यांना कारागृहात पाठवले. याच कारागृहात यापूर्वी सहा महिन्यांची शिक्षा शशिकला यांनी भोगली होती.
स्व. जयललितांनी हकालपट्टी केलेल्या नातेवाईकांना पुन्हा पक्षात घेतले
काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्या गोटातील ओळखले जाणारे आ. सरवनन यांनी पोलिस महासंचालकांची भेट घेऊन व्ही. के. शशिकला व पलानीस्वामी यांच्याविरोधात अपहरण व डांबून ठेवण्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, 8 फेब्रुवारीपासून आपल्यासह पक्षाच्या सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये धमकावून डांबून ठेवले होते. आपण कसे तरी स्वतःची सुटका केली. त्यांच्या या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी कांचीपुरमचे पोलिस अधीक्षक जे. मथुरासी यांच्या नेतृत्वातील पोलिस पथकाने बुधवारी सकाळी रिसॉर्टवर जाऊन सर्व आमदारांची चौकशी केली होती. त्यावेळी काहींनी आपण स्वमर्जीने येथे रहात असल्याचे सांगितले होते. दरम्यान, बुधवारीही जोरदार राजकीय घडामोडी सुरुच होत्या. स्व. जयललिता यांनी पक्षातून हकालपट्टी केलेल्या शशिकलांच्या नातेवाईकांची शशिकला यांनी पुन्हा पक्षात वर्णी लावली आहे. त्यांचे पुतणे टी. टी. व्ही. दिनकरन यांना पक्षाच्या उपसरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आले आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडून सरकार स्थापण्यासाठी आमंत्रण येण्याची वाट पहात असल्याचे दिनकरन यांनी सांगितले. कालच पक्षाचे नवनियुक्त विधिमंडळ नेते पलानीस्वामी यांनी 11 आमदारांसह राज्यपालांची भेट घेतली होती. व 125 आमदारांचा आपणास पाठिंबा असल्याचे सांगत, सत्ता स्थापण्याचा दावा केला होता.