शशिकलांना झटका, दिनकरन अटकेत!

0

चेन्नई : अन्ना द्रमुक (एआयडीएमके) पक्षाच्या महासचिव व्ही. के. शशिकला यांना बुधवारी जोरदार झटका बसला आहे. शशिकला यांचे भाचे व पक्षाचे उपमहासचिव टीटीव्ही दिनकरन यांना मंगळवारी रात्री सीबीआयने अटक केली. पक्षाचे चिन्ह मिळविण्यासाठी त्यांनी चक्क निवडणूक आयोगालाच 60 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. कालच सीबीआयने त्यांची तब्बल सात तांस कसून चौकशी केली होती. दरम्यान, शशिकला यांचे छायाचित्र पक्षाच्या मुख्यालयातून हटविण्यात आले असून, पक्षाचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्या गटाने या हालचालीनंतर एकत्र येण्यास अनुकुलता दर्शविली आहे.

दिनकरन् यांची सात तास चौकशी
एआयडीएमके पक्षाचे दोन पान हे पक्षचिन्ह आपल्याच गटाला मिळावे यासाठी दिनकरन यांनी चक्क मुख्य निवडणूक आयुक्तांनाच मध्यस्थांमार्फत 60 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून, काल त्यांची सात तास कसून चौकशी केली. त्यानंतर रात्री त्यांना अटक करण्यात आली. एआयडीएमके पक्षाचे दोन तुकडे झाल्यानंतर ओ. पन्नीरसेल्वम गटानेही पक्षाचे चिन्ह आपल्याला मिळावे, अशी मागणी केली होती. दोन गटातील वाद पाहाता, आयोगाने पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवले होते. स्व. जयललिता यांच्या निधनानंतर पक्षाचा ताबा व्ही. के. शशिकला यांनी घेतला असून, त्यांनीच माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांना राजीनामा देण्यासाठी दबाव आणला होता. तसेच, जयललिता यांनी पक्षातून काढून टाकलेल्या दिनकरन यांनाही शशिकला यांनी पक्षात घेऊन त्यांना उपमहासचिव केले होते. शशिकला सद्या कारागृहात असून, तेथून त्या पक्ष चालवित असल्याचे दिसून आले आहे.

मध्यस्थाने दिली गुन्ह्याची कबुली
सीबीआय सूत्राच्या माहितीनुसार, दिनकरन यांनी सुकेश चंद्रशेखर या मध्यस्थामार्फत निवडणूक आयोगाला लाच देऊन पक्षाचे चिन्ह आपल्याच गटाला मिळविण्यासाठी प्रयत्न केला होता. दिल्ली पोलिसांनी चंद्रशेखर याला 1.30 कोटींच्या रोख रकमेसह एका हॉटेलात पकडले होते. त्याच्या चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. सद्या चंद्रशेखर हा कारागृहात आहे. त्यानेच दिनकरन यांनी हे पैसे दिल्याचे व आयोगाला लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची कबुली दिली होती. सोमवारी चंद्रशेखर याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दिनकरन यांच्याविरुद्ध का कारवाई करत नाही, अशी विचारणा पोलिसांना केली होती. त्यानंतर सीबीआयने दिनकरन यांना चौकशीसाठी बोलावले होते व काल रात्री अटक केली.