चेन्नई । जयललिता यांच्या निधनांनतर तामीळनाडूच्या चिन्नमा बनण्यास निघालेल्या शशिकला नटराजन यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मोठ्या शिक्षेनंतर आता तामीळमधील राजकीय समीकरणे खर्या अर्थाने बदलतील, असे संकेत आहेत. या शिक्षेमुळे आता शशिकला 10 वर्ष मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सत्र न्यायालयाने सुनावलेला 4 वर्षांच्या शिक्षेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. त्यानंतरही 6 वर्षे मुख्यमंत्रीपदी विराजमान होता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे शशिकलांचे राजकीय करिअर संपुष्टात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याकडे आता केवळ सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्याचा एकमेव मार्ग आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र, भाजप सरकार मात्र तटस्थेच्या भूमिकेत आहे. पन्नीरसेल्वम यांनी बहुमत सिद्द केले तरच ते मुख्यमंत्री पदी विराजमान होवू शकतात.
1996 मध्ये तत्कालीन जनता पार्टीचे नेते आणि सध्या भाजपमध्ये असलेले सुब्रमण्यम स्वामी यांनी जयललितांवर 1991 ते 1996 पर्यंत मुख्यमंत्री असताना 66.44 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जमावल्याचा खटला दाखल केला होता.जयललिता, शशिकला आणि इतर दोघांनी 32 कंपन्या स्थापन केल्या पण त्यांचा काहीही व्यवहार नव्हता. या कंपन्या केवळ काळ्या पैशातून प्रॉपर्टी खरेदी करायच्या. या प्रकरणाची सुनावणी तामीळनाडूबाहेर बेंगळुरूच्या स्पेशल कोर्टात झाली. त्यात कोर्टाने 27 सप्टेंबर 2014 रोजी जयललिता, शशिकला आणि इतर दोघांना दोषी ठरवले. त्यांना चार वर्षांची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड सुनावण्यात आला होता. पण, मे 2015 मध्ये कर्नाटक हायकोर्टाने सर्वांना निर्दोष मुक्त केले होते. कर्नाटक सरकारने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज केले. सुप्रीम कोर्टाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
अशी असेल शशिकलांची शिक्षा?
सुप्रीम कोर्टाने शशिकला यांना 4 वर्षांच्या शिक्षेचा सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यात त्यांना उर्वरित साडे तीन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे. पब्लिक रिप्रेझेंटेशन अॅक्टनुसार कोणतीही व्यक्ती दोषी ठरवल्यानंतर कोणत्याही शासकीय पदावर राहता येत नाही. 4 वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतरही 6 वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. मात्र, शशिकला सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटीशन दाखल करू शकतात.
डीएमकेचे नेतृत्त्व कोणाकडे?
सध्या स्टॅलिन यांच्याकडे डीएमकेचे नेतृत्त्व आहे. त्यांनी राज्यपालांची भेटही घेतली होती. शशिकला यांच्या गटाने पन्नीरसेल्व्हमना पाठिंबा दिला नाही तर ते स्टॅलिनची मदत मागू शकतात. स्टॅलिन पन्नीरसेल्व्हमना पाठिंबा देऊन सत्ता मिळवण्याचा विचार करू शकतात. आता बदललेली समिकरणे बघता एका मोठ्या गटाचा पाठिंबा मिळवत स्टॅलिन मुख्यमंत्रीपदीही विराजमान होऊ शकतात.