अमळनेर । शहरातील आर्थिक दृष्टा दुर्बल महिलेला पोटाच्या गंभीर स्वरुपाच्या विकाराने ग्रासले होते. गेल्या अनेक दिवसापासून ही महिला पोटाच्या विकाराने त्रस्त हेती. शस्त्रक्रियेची आवश्यकता होती मात्र आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने शस्त्रक्रिया करणे अवघड झाले होते. मात्र या महिलेला प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या नावाने सुरु असलेल्या सलमान खान फाऊंडेशनने मदतीची हात दिली आहे. फाऊंडेशनने शस्त्रक्रियेसाठी 10 हजारांची आर्थिक मदत मिळाल्याने महिलेवर डॉ.अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाऊंडेशन येथे यशस्वी शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. सुनीता रविंद्र महाजन असे या महिलेचे नाव आहे. शहरातील श्रीराम कॉलनी येथील ती रहिवासी आहे.
सलमानखान बनले अमळनेरकरांचे हिरो
प्रस्ताव मंजूर होऊन 10 हजारांचा धनादेश हॉस्पिटलच्या नावाने प्राप्त झाला आहे. यामुळे त्या महिलेवर डॉ.शिंदे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला जीवदान दिले आहे. दरम्यान त्या माहिलेसह तिच्या कुटुंबीयांनी अभिनेता सलमान खान यांच्यासह डॉ.शिंदे यांचे विशेष आभार मानून माझासाठी ते देवदूत ठरल्याची भावना व्यक्त केली. आरोग्य क्षेत्रात सलमान खान यांची ही संस्था अनेक गोरगरीब पीडितांना आर्थिक मदत देऊन पुण्यकर्म करीत आहे. याआधी देखील तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील पीडित बालकास सलमान खान यांनी मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून लाखोंची मदत केल्याने त्यालाही जीवदान मिळाले आहे. यामुळे अमळनेरकरांसाठी खान आता रिअल हिरो ठरला आहे.
डॉ.शिंदे यांचा सल्ला
सुनिता महाजन हिला पोटाच्या विकाराने ग्रासले होते. डॉ.अनिल शिंदे यांच्याकडे तपासणी केली असता आजाराचे स्वरूप डॉ.शिंदे यांच्या लक्षात येऊन त्यांनी पोटाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येणार होता त्यामुळे हा खर्च पेलने महिलेसाठी अवघड होते. अशा वेळी डॉ.शिंदे यांनी अभिनेता सलमान खान फाऊंडेशनला प्रस्ताव पाठविण्याचा सल्ला दिला. नर्मदा मेडिकल फाऊंडेशनच्या नावाने प्रस्ताव तयार करून फाऊंडेशनकडे प्रस्ताव पाठविण्यात आले.