सुरक्षा रक्षकाला मारहाण ; रोकडसह सीसीटीव्ही रेकॉर्डर लांबवले
चाळीसगाव :– तालुक्यातील हिरापूर गावाजवळील पेट्रोल पंपावर चारचाकीतून आलेल्या दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत सुरक्षा रक्षकाला मारहाण करून दहा ते 15 हजारांची रोकड लांबवली. शनिवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याने घबराट पसरली आहे. नुकताच हा पेट्रोल पंप सुरू करण्यात आला असल्याची माहिती मिळाली.
कुविख्यात दरोडेखोरांनी चोरी करताना फुटेजमध्ये आपला चेहरा येऊ नये यासाठी जाताना सीसीटीव्हीचे रेकॉर्डर लांबवले तसेच कर्मचार्यांकडील मोबाईलच्या बॅटरी काढून फेकल्याचे सूत्रांनी सांगितले. पंपाचे मालक सुनिल भावसार यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अरविंद पाटील, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.