पुणे । शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख बदलणार हे निश्चित झाले आहे; पण त्या जागी वर्णी कोणाची लागणार याची उत्सुकता शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे.माजी आमदार विनायक निम्हण यांनी शहर प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. निम्हण मुळचे शिवसैनिक; सेनेच्या वतीने ते दोन वेळा आमदार झाले होते. नंतर ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याबरोबर निम्हण सेनेतून बाहेर पडून काँग्रेसवासी झाले. परंतु ते तिथे फारसे रमले नाहीत; पुन्हा शिवसेनेत आले. महापालिका निवडणुकीच्या सुमारास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शहर प्रमुखपदाची जबाबदारी दिली. आता त्यातून ते बाहेर पडू इच्छितात. राज्यातील अनेक शहर प्रमुख नव्याने नेमले जाणार आहेत, त्यावेळी पुण्याचाही फैसला होईल, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
शहर प्रमुखपदासाठी माजी आमदार महादेव बाबर आणि चंद्रकांत मोकाटे यांची नावे चर्चेत आहेत. दोघांनाही महापालिका आणि संघटनेचा अनुभव आहे. बाबर यांचे कार्यक्षेत्र कोंढवा आणि मोकाटे यांचे कोथरूड आहे. दोघेही तुल्यबळ असल्याने निवड करताना नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. एखाद वेळी तिसर्याला संधी मिळू शकते. त्यामुळेच सैनिकांमध्ये उत्सुकता आहे.
सध्यातरी सेनेत शांतता आहे, प्रमुख नसल्याने कार्यक्रमही नाहीत. राज्यात सेनेची आंदोलने चालू आहेत; पण पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरात नवी निवड लांबविणे पक्षसाठी परवडणारे नाही. शिवाय नव्या-जुन्यांचा मेळ जमविणारा नेता हवा अशीही जाणकारांची अपेक्षा आहे.