शहरप्रमुखपदी दोन माजी आमदार

0

पुणे । शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी माजी आमदार महादेव बाबर आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची नेमणूक केली आहे. याद्वारे दोन शहरप्रमुख नेमण्याचा जुनाच फॉर्म्युला शिवसेनेने परत एकदा पुण्यात आणला आहे. मात्र, या प्रयोगात दोन माजी आमदार शहराच्या राजकीय प्रवाहात पुन्हा आघाडीवर आले आहेत.

मतदारसंघ वाटून देण्याचा प्रयोग
पुणे महानगर म्हणून आकारास येत आहे. तरीही भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी संघटनेसाठी एकच प्रमुख अध्यक्ष नेमले आहेत. शिवसेना आणि मनसे या पक्षांनी मात्र दोन शहर प्रमुख नेमण्याचा पायंडा आलटून पालटून चालू ठेवला आहे. शहर प्रमुखांना विधानसभेचे मतदारसंघ वाटून देण्याचा प्रयोग यापूर्वी झाला आहे. दोन प्रमुख नेमून काय साध्य झाले हे सांगणे कठीण आहे. सेनेत या अगोदर विनायक निम्हण एकमेव शहरप्रमुख होते. त्यावेळी मनसेत दोन शहर प्रमुख होते. मनसेने आता एकच शहर प्रमुख नेमले आहेत आणि शिवसेनेने दोन नेमले आहेत.

संघटनेत बदल होण्याचे संकेत
माजी आमदार विनायक निम्हण यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर या नव्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. संपर्क प्रमुख उदय सामंत यांनी संघटनेत बदल होतील, असे नुकतेच सूचित केले होते. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पुणे दौर्‍यातच नवे पदाधिकारी नेमले गेले.

शहर उपप्रमुख पदी किरण साळी
नव्याने शहर प्रमुखपदी नेमलेल्यापैकी महादेव बाबर यांच्याकडे हडपसर, कॅटोन्मेंट, वडगावशेरी, खडकवासला विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली असून कसबा, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती मतदारसंघांची जबाबदारी चंद्रकांत मोकाटे यांना दिली आहे. बाबर हे कोंढव्यातील रहिवासी आहेत आणि मोकाटे कोथरुडवासीय आहेत. याखेरीज संघटनेत शहर उपप्रमुख पदावर युवा सेनेचे शहर प्रमुख किरण साळी आणि सहसंपर्क पदावर माजी नगरसेवक अजय भोसले आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांची नेमणूक झाली आहे.