पुणे : वाहने, हवेतील प्रदूषण वायू यांच्या वाढत्या प्रमाणामुळे शहरातील पर्यावरणाची स्थिती दिवसेंदिवस दयनीय होत असल्याचे महापालिकेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या पर्यावरण अहवालाने स्पष्ट केले आहे.
शहरात 2017 साली मागील वर्षापेक्षा 2 लाख 70 हजार गाड्या वाढल्या आहेत. या नोंदणीप्रमाणे शहरातील प्रति नागरिकामागे वाहनांची संख्या 1 पेक्षा अधिक झालेली आहे.2013-14 पासून विमानाने प्रवास करण्यात पुणेकर अग्रेसर होत असून यंदा ही संख्या 65लाख 12 हजार 5 इतक्या नागरिकांवर पोचली आहे.रेल्वे प्रवाशांची संख्या मात्र घटलेली दिसून आली आहे. बस प्रवाशांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहणे पुणेकरांनी नाकारले असून स्वतः वाहन घेऊन प्रवास करण्यास प्राधान्य दिल्याचे आकडेवारीवरून कळत आहे.शिवाय प्रदूषणात वाढ करणार्या गंधकाचे प्रमाण यंदा सर्वाधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. हडपसर, नवी पेठ, मंडईमध्ये नायट्रोजनाची पातळी सर्वाधिक असल्याचे स्पष्ट आहे. शहरातील ओझोन वायूचे प्रमाणही यंदा घटले आहे.नद्यांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.बी ओ डी’चे वापर पाण्यातील जैविक पदार्थांच्या प्रदूषणाचा मापदंड मानला जातो.शहरातील नद्यांच्या पाण्यातील बी ओ डीचे प्रमाण वाढले असल्याचे परिक्षणातून सिद्ध झाले आहे.मागील सहावर्षांपेक्षा अधिक म्हणजे तब्बल 56 इतका बीओडी नोंदवण्यात आला आहे. ध्वनी प्रदूषणानेही यंदा वडगाव वगळता इतर ठिकाणी दिवसाची ध्वनी पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मानाकापेक्षा जास्त आहे.
शहराला अर्बन हिट आयलँडचा धोका
शहरात झाडे कमी असल्यामुळे सूर्याची उष्णता जमीन शोषून पुन्हा परावर्तित करते.त्यामुळे पुण्यातील तापमान हे आजूबाजूच्या गावांपेक 4 ते 5 अंश सेल्सियस जास्त आहे.त्यामुळे अनेकांना उष्माघात, डोकेदुखी, थकवा येणे इत्यादींची लक्षणे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. यावर केवळ झाडे लावणे हाच शाश्वत उपाय असल्याचे नमूद केले आहे.