250 एमएलडी पाणी बंद; पोलीस बंदोबस्तात पंप केले बंद
पुणे : शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार नसल्याचे खुद्द मुख्यमंत्री आणि पालकमंत्री सांगत असतानाच पाटबंधारे विभागाने पुन्हा शहराचे पाणी तोडले. शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरणावरील दोन विद्युत पंप पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी बुधवारी दुपारी तीन वाजता पोलीस बंदोबस्तात बंद केले. वारंवार सूचना देऊन व पत्रव्यवहार करूनही महापालिकेकडून पाण्याचा वापर कमी केला जात नसल्याने पर्वती केंद्राला बंद पाइपलाइनमधून सोडले जाणारे 250 एमएलडी पाणी बंद केले आहे. या अघोषित पाणीकपातीमुळे सायंकाळी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
जलसंपत्ती नियमन प्राधिकारणाने शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने 892 एमएलडी इतकेच पाणी उचलावे यासाठी पाटबंधारे विभाग आग्रही आहे. मात्र, पालिकेकडून त्याची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. पाणीपुरवठ्यात पालिकेकडून कपात होत नसल्याने पाटबंधारे विभागाने जलसंपदा खात्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रारही केली आहे.
892 एमएलडी पाणी उचलणे अपेक्षित
गेल्या काही दिवसांपासून पालिका व जलसंपदा विभागात पाणी वितरणावरून वाद सुरू आहे. खडकवासला धरणप्रकल्पात पाणीसाठा कमी असल्याने शेतीला व पिण्यासाठी 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने वारंवार पालिकेच्या अधिकार्यांना धरणातून नियमानुसार पाणी उचलावे, अशा सूचना दिल्या होत्या मात्र, त्यात बदल झाला नाही. बुधवारी पालिकेने 1402 एमएलडी पाणी घेतले. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार पालिकेने 892 एमएलडी पाणी उचलणे अपेक्षित आहे. पाण्याचा वापर जास्त होत असल्याने जलसंपदा विभागाने पंप बंद करण्याची कार्यवाही केली.
येत्या 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन
येत्या 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पंपाद्वारे पाइपलाइनच्या माध्यमातून पर्वती केंद्राला दिले जाणारे 250 एमएलडी पाणी बुधवारी दुपारी 3 वाजता थांबविले असल्याचे खडकवासला धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले आहे.