पोलिस महासंचालकांची मुंबईत बैठक
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठी गेल्या काही दिवसांपासून जागा मिळत नव्हती. नुकतीच काही अधिकार्यांनी महापालिकेच्या विविध ठिकाणच्या जागांची पाहणी केली. त्यानुसार आता प्रेमलोक पार्क परिसरात होणार असल्याचे परिमंडल तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला कळविले़ प्रेमलोक पार्कमधील शाळा इमारत आयुक्तालयास देण्यासाठी सामाजिक संघटनांचा, नागरिकांनी विरोध दर्शविला होता. मात्र आता स्थानिकांनी आयुक्तालयास संमती दिली आहे. दरमहा 16 लाख 22 हजार 767 रुपये भाडे आकारणीचा दर महापालिकेने निश्चित केला आहे.
पोलिस आयुक्तालय सुरू होण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा चर्चेत येताच पोलिस महासंचालक माथूर यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील, तसेच पिंपरी विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची तातडीची बैठक बोलावली. आयुक्तालयासाठी तात्पुरती व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात पोलिस आयुक्तालय सुरू करायचे आहे, नंतर शासन स्तरावर उपलब्ध होणार्या जागेवर कायमस्वरूपी पोलिस आयुक्तालय स्थलांतरित होणार आहे. परिमंडल तीनचे पोलिस उपायुक्त शिंदे यांनी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यामार्फत यापूर्वीच आयुक्तालयाच्या जागांचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. प्रेमलोक पार्क, निगडीतील शाळा इमारत, मोशीतील प्राधिकरणाची जागा, एचए कंपनीचा भूखंड, ताथवडे येथील जागा, प्राधिकरण कार्यालय, गायरान जागा आदी ठिकाणी जागा आहेत. तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालय सुरू करण्यात येणार असल्याने यापैकी सोईस्कर ठरणारी जागा निश्चित करा.
महासंचालकांनी दिले आदेश
राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर दीड महिना उलटून गेला आहे. महाराष्ट्रदिनी कामाची सुरूवात करून पोलिस आयुक्तालय सुरू होणार, अशी पोलिसांना, नागरिकांना अपेक्षा होती. मात्र जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने हा महाराष्ट्रदिनाचा मुहूर्त टळला. आता 15 ऑगस्टचा मुहूर्त साधण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. शहरात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 12 इमारती आणि 6 मोकळ्या जागा आहेत. नुकतीच मुंबईत झालेल्या एका बैठकीत पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी उपलब्ध जागांमधून जागा निश्चित करण्यासाठी कामाचा वेग वाढवा. त्यानंतर मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही होईल, असा आदेश पुणे शहर पोलिस अधिकार्यांना दिले होते. त्यानंतर जागा निश्चितीसाठी पोलिस अधिकार्यांची पुन्हा धावाधाव सुरू झाली आहे.