शहराच्या ऐकतेसाठी धावले पिंपरी चिंचवडकर !

0

देशाच्या ऐकतेसाठी ‘रन फॉर युनिटी’ महत्वाची- महापौर

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

पिंपरी चिंचवडः भारत देश विविध परांपरा आणि संस्कृतींनी जोडलेला आहे. या देशात अनेक सण – उत्सव साजरे होत असतात. ही परंपरा इतिहासापासून जोडलेली आहे. एकता ही देशाची ताकद असून देशातील एकता कायम राखण्यासाठी ‘रन फॉर युनिटी‘ महत्वाची असल्याचे मत पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरात स्पाईन रोड, चिंतामणी चौक ते वाल्हेकरवाडी अशी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर जाधव बोलत होते.

एकता दिवसाची नागरिकांनी घेतली शपथ
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या एकता दौडमध्ये मोठया संख्येने पिंपरी चिंचवडकर सहभागी झाले होते. महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या हस्ते पांढरी झेंडी दाखवून दौडला सुरुवात झाली. दौडच्या सुरुवातीला राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देण्यात आली. एकता दौडचे संयोजन नगरसेवक नामदेव ढाके यांनी केले होते. सकाळी साडे सहाच्या सुमारास चिंचवड येथील चिंतामणी चौक येथून दौडला सुरुवात करण्यात आली. एक भारत श्रेष्ठ भारत, धावेल भारत, जोडेल भारत… अशा घोषणा यावेळी नागरिकांनी दिल्या.

दौडमध्ये पिंपरी चिंचवडकरांचा उत्स्फुर्त सहभाग
यावेळी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर शैलेजा मोरे, नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेवक शितल शिंदे, भाजपा प्रदेश सरचिटणीस उमाताई खापरे, दैनिक जनशक्तिचे मुख्य संपादक तथा उद्योजक कुंदन ढाके, उद्योजक मिलिंद चौधरी, किरण चौधरी, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, मनपाच्या क्रीडा विभागप्रमुख आशा राऊत, प्रशासकीय अधिकारी पोमण, यासह रवि बर्‍हाटे, डॉ. प्रशांत पाटील, शंकर पाटील, वासुदेव पाटील, राजेंद्र सांगुकार, अशोक बोडखे, भुषण सरोदे, योगेश महाजन, विकास चौधरी, प्रदीप पटेल, रामदास पाटील, बिभीषण चौधरी, कुशल नेवाळे, ज्योतीताई ढाके, रेखा भोळे, सीमा ढाके, पद्मावती शंकपाळ, गौरी सरोदे, शीतल नारखेडे, यांच्यासह वाल्हेकरवाडी मनपा शाळा, काळभोर नगर मनपा शाळेतील 1800 विद्यार्थी, महिला – पुरुषांनी एकता दौड रॅलीत सहभाग घेतला.

देशाची अखंडता परंपरा जपणे आवश्यक
एकता दौडच्या माध्यमातून देशाची अखंडता परंपरा जपून, देशाला समृद्धीकडे नेण्याचे आवाहन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकता दौड समारोप कार्यक्रम प्रसंगी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेलांचे देशासाठी मोठे योगदान असून त्यांनी देशातील नागरिकांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे नगरसेवक शितल शिंदे म्हणाले.

पटेलांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी – पवार
देश घडतांना ज्या व्यक्तींचे योगदान आहे. त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान आहे. देश अखंडीत ठेवण्यात त्यांची कामगिरी मोठी आहे. सगळयांना एकाच धाग्यात गुफण्यायचे काम त्यांनी केले. सरदार या नावातच त्यांचे नेतृत्वगुण दिसून येतात. म्हणूनच आज राष्ट्रीय एकता दिनाचे व राष्ट्रीय संकल्प दिनाचे आयोजन करण्यात आहे. प्रत्येक नागरिकाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेवून आपले जीवन समृध्द करावे, असे मत पक्षनेते एकनाथ पवार यांनी मांडले.

आजचा दिवस देशासाठी अभिमानास्पद
नगरसेवक नामदेव ढाके म्हणाले, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे आज लोकार्पण होत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 143 वी जयंती आहे. त्याचेच औचित्य साधत या पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. सरदार पटेल यांंचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. या पुतळ्याचे एक मराठी कनेक्शनही आहे. शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला आहे. देशाच्या जडणघडणीतले सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान फार मोठे आहे. तसेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यामुळेच सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुषही म्हटले जात असल्याचे त्यांनी सांगितले.