शहराच्या प्रत्येक नोडमध्ये चिकन, मटन मार्केटची निर्मिती होणार

0

नवी मुंबई :- शहरातील चिकन आणि मटन विक्रेत्यांसाठीची परवानाप्रक्रिया सुलभ करण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव आणण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी कोपरखैरणे येथे झालेल्या एका सभेत सांगितल्याने शहरातील चिकन व मटन विक्रेत्यांकडून आनंदाचे वातावरण पसरले आहे.परवाना प्रक्रिया आणि अवेळी होणारा त्रास यामुळे त्रस्त झालेल्या चिकन व मटन व्यापार्‍यांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी जब्बार खान यांच्या नेतृत्वाखाली गणेश नाईक यांची भेट घेतली.त्यावेळी गणेश नाईक यांनी व्यावसायिकांना दिलासा दिला.

प्रत्येक नोडमध्ये चिकन व मटन मार्केट निर्मितीसाठी प्रयत्न
चिकन आणि मटन व्यावसायिकांचे प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवण्यासाठी निश्चित मार्ग काढू असे सांगत प्रत्येक नोडमध्ये चिकन व मटन मार्केट निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासनही नाईक यांनी त्यावेळी व्यावसायिकांना दिले. सभेत आलेल्या सर्व व्यावसायिकांच्या मागण्या नाईक यांनी ऐकून घेतल्या असत्या त्यांनी पालिकेच्या अधिकार्‍यांना तत्काळ सूचना करत पालिकेच्या आगामी सभेत सदर प्रस्ताव आणावे असे निर्देश दिले. पशुवैद्यकीय विभागातर्फे होणारी जप्तीची कारवाई त्वरित थांबवावी, प्रत्येक नोडमध्ये चिकन व मटन मार्केट निर्माण करावे, परवान्यांसाठी एक निश्चीत धोरण तयार करावे, पोलिसांची जाचक कारवाई थांबवण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी व्यावसायिकांकडून नाईक यांना देण्यात आले.

महासंघ स्थापन करण्याचा निर्णय
यावेळी 350 अधिक चिकन व मटन विक्रेते उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी चिकन व मटन विक्रेत्यांच्या विविध संघटनांची जब्बार खान यांच्या नेतृत्वाखाली सभा पार पडली होती. त्यावेळी एक महासंघ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावरही चर्चा झाली असता सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी महापौर सागर नाईक, माजी उपमहापोर अशोक गावडे, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, नगरसेवक सुरेश कुलकर्णी, देविदास-हांडे पाटील, अशोख गुरखे,चंद्रकांत पाटील त्याचबरोबर चिकन व मटन विक्रेते मोठ्या प्रमाणत उपस्थित होते.