भुसावळ । महात्मा गांधींच्या आवाहनानुसार भुसावळचे अण्णासाहेब दास्ताने वकिली सोडून 5 फेब्रुवारी 1921 मध्ये स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय झाले. त्यांच्यामुळे लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल हे भुसावळला आले. भुसावळच्या मातीला स्वातंत्र्याच्या क्रांतीचा सुगंध आहे, अशी माहिती भालोद महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. जतीन मेढे यांनी येथे दिली.
यांची होती विचारमंचावर उपस्थिती
अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे नवशक्ती ऑर्केड परिसरात त्यांचे व्याख्यान झाले. त्यात त्यांनी ‘स्वातंत्र्याची शौर्यगाथा’ या विषयावर विचारपुष्प गुंफले. विचारमंचावर अध्यक्ष पोपटराव पाटील, सचिव रजनी बेंद्रे, कोषाध्यक्ष महादेव हरिमकर यांची उपस्थिती होती.
भुसावळ तालुका क्रांतीकारकांची भूमी
व्याख्यानात प्रा. मेढे म्हणाले की, भुसावळ शहर व तालुका स्वातंत्र्यपूर्व कालखंडात क्रांतीकारकांना घडवणारी क्रांतीभूमी होती. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, शंकरराव देव, सेनापती बापट, पंडित नेहरु या महान देशभक्तांच्या सभा व मार्गदर्शनाने ही भूमी व येथील तत्कालीन देशभक्त घडले. खिरोदा येथील विठ्ठल मंदिर 31 जानेवारी 1930 रोजी अस्पृश्य बांधवांसाठी साने गुरुजींच्या पुढाकाराने खुले झाले होते. महात्मा गांधींच्या खिरोदा दौर्यात अस्पृश्य बांधवांचा सक्रीय सहभाग पाहून गांधीजी म्हणाले होते की, ‘खिरोदा मेरे लिए तीर्थक्षेत्र है’. त्यानंतर धनाजी नाना म्हणाले होते ‘तीर्थक्षेत्र तो नही मगर बनानेकी कोशिश करूंगा’.
साने गुरुजींच्या भाषणांचा प्रभाव
हिंगोण्याचे स्वातंत्र्यसेनानी पंढरीनाथ फालक यांनी सानेगुरुजी, धनाजी नाना यांच्या भाषणांनी प्रभावित होऊन विद्यार्थी जीवनातच स्वातंत्र्या लढ्याच्या आंदोलनात उडी घेतली. हिंगोण्यात पोस्टमनला लुटून ते पैसे क्रांतीकारकांना आंदोलन उभारण्यासाठी देण्यात फालक यांचे मोठे योगदान होते. ब्रिटिशांना हादरा देण्यासाठी ते गावागावात जाऊन त्याठिकाणी आपला राष्ट्रध्वज फडकवायचे. तसेच ब्रिटीशांचा एकमेकांशी होणारा संपर्क तोडण्यासाठी टेलिफोनच्या तारा तोडून त्यांच्या संपर्काचे साधनांचे नुकसान करायचे. तसेच खिरोद्याचे कर्मयोगी धनाजी नाना चौधरी यांनी तत्कालीन सरकारची फौजदारकीची नोकरी सोडून देशभक्तीच्या या होमकुंडात 16 जून 1930 रोजी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. आपल्या परिसरात स्वातंत्र्याच्या चळवळीला गती देण्याचे व फैजपूर काँग्रेसचे अधिवेशन यशस्वी करण्याचे कार्य त्यांनी केले. धनाजी नानांच्या कार्यामुळे संपुर्ण परिसरातील तरुणाई स्वातंत्र्य लढ्याने प्रेरित झाली असल्याचेही प्रा. मेढे यांनी सांगितले.