शहराच्या समसमान विकासकामांमध्ये नितीन लढ्ढा यांचा खोडा

जनशक्ती न्यूज | चिन्मय जगताप|  जळगाव शहराला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नितीन लढ्ढा हे त्यांचा प्रभाग सोडून इतर प्रभागांच्या विकास कामासाठी निधी मिळू देत नसल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी जनशक्तीशी बोलताना केला.

दारकुंडे म्हणाले की, जळगाव शहराची दुरवस्था बघता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे मात्र तो निधी १९ प्रभागात समसमान भागात न वाटता शिवसेनेचे वरिष्ठ नेतेच हा निधी आपापसात वाटत आहेत. यामुळे त्यांना पुढील काळात लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

शिवसेनेत भाजपा सारखीच तऱ्हा
भारतीय जनता पक्षातले काही नेते त्यांच्या वरिष्ठांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात. निधी योग्य प्रमाणात वाटला जात नाही. हे आमचे भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचे मुख्य कारण होते. राज्यात आणि महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे आमच्या प्रभागातील कामे लवकरात लवकर होतील. अशी आमची अपेक्षा होती, मात्र शिवसेनेत सुद्धा भाजपासारखेच चित्र आम्हाला पाहायला मिळत असल्याची आम्हाला खंत आहे, असेही यावेळी दारकुंडे म्हणाले. असे असले तरी आम्ही इतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

आमच्या प्रभगतही मुख्य रस्ते आहेत
दारकुंडे म्हणाले , की आम्ही आमच्या प्रभागाची विकासकामे जेव्हा नितीन लढ्ढा यांच्याकडे घेऊन जातो, तेव्हा लढ्ढा आमच्या कामांना प्राधान्य देत नाहीत. उलट शहरातल्या मुख्य रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आम्हाला सांगतात. आमच्या प्रभागात मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते नाहीत का? असं प्रश्न आम्हाला पडला आहे. याच बरोबर जर निधीचे वाटप व्हायचे असेल तर ते १९ प्रभागात समसमान पद्धतीने व्हावे, अशी आमची मागणी आहे.

लढ्ढा बुलेट ट्रेनही आपल्या प्रभागात नेतील
इतर प्रभागांना निधी मिळू न देण्याच्या लढ्ढा यांच्या वृत्तीचा खरपूस समाचार घेत दारकुंडे असेही म्हणाले की , समजा भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जळगाव शहराला बुलेट ट्रेन मंजूर केली तर नितीन लढ्ढा ही ट्रेन देखील केवळ ‘आपल्या’ च प्रभागात नेण्यासही कमी करणार नाहीत.