शहराच्या स्वतंत्र स्थानासाठी ‘व्हिजन’ची आवश्यकता-आयुक्त हर्डीकर

0

पिंपरी-चिंचवड : शहराचे जागतिक पातळीवर वेगळे स्थान व वैशिष्ट्यपूर्ण शहर म्हणून नावलौकीक मिळविण्यासाठी आगामी काळातील विकासासाठी व नियोजनासाठी अधिकार्‍यांनी वैयक्तिक जबाबदारी स्वीकारुन मूल्यांची जोपासना करावी. तसेच आपले कर्तव्य बजावावे. शहराचे सन 2030 पर्यंतचे नियोजन करून त्यानुसार कार्य करण्यासाठी तत्पर राहण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. शहराचा नावलौकीक आहे. परंतु, स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी ‘व्हिजन’ निश्‍चित करावे लागेल. सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या दृष्टीकोनातून ठरविण्यात येणार्‍या धोरणांची अंमलबजावणी करताना अधिकार्‍यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असेही ते म्हणाले.

‘परिवर्तन’ची नियोजन कार्यशाळा
महापालिकेच्या शहर परिवर्तन कार्यालयाच्या वतीने सन 2030 पर्यंतच्या नियोजन विषयक कार्यशाळेचे आयोजन महापालिका अधिकार्‍यांसाठी मुळशी येथील गरूडमाचीच्या प्रशिक्षण केंद्रात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. शुक्रवारी व शनिवारी आयोजित दीड दिवसाच्या या कार्यशाळेत सर्व विभागप्रमुख सहभागी झाले होते.

वाहतूक, पर्यावरण, पर्यटन मुद्दे
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी शहर विकासाच्या नियोजनाची दिशा याबाबतीत ठरवण्यात येणार्‍या मुद्यांबाबतची माहिती देण्यात आली. त्यामध्ये चिरंतन वाहतूक सुविधा व व्यवस्था, पर्यावरण व राहणीयुक्त शहर, पर्यटन व सांस्कृतिक, प्रशासन व कायदा, माहिती व तंत्रज्ञान आणि शहराचा आर्थिक विकास या विषयांवर चर्चा झाली. त्या अनुषंगाने अधिकार्‍यांची मते जाणून घेण्यात आली.

सुधारणाविषयक मुद्यांवर चर्चा
या विषयांबाबत शहराची सद्यस्थिती व त्यामध्ये करावयाच्या सुधारणांबाबत चर्चा करण्यात आली.राष्ट्रीय व जागतिक पातळीवर असणा-या मापदंडाबाबतही चर्चा झाली. दुसर्‍या दिवशी गट चर्चेच्या माध्यमातून विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. एकात्मिक चिरंतन विकासासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी योगदान दिल्यास शहर परिवर्तन करणे सुलभ होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

विविध प्रात्यक्षिकांव्दारे प्रशिक्षण
दुसर्‍या दिवशी सकाळच्या सत्रात क्षमता बांधणी व विकास अंतर्गत विविध प्रात्याक्षिकांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर धोरण आखणी व नियोजनबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये सर्व अधिकार्‍यांनी सहभाग घेतला. अधिकार्‍यांमध्ये समन्वयासाठी व वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी याबाबतीतही मार्गदर्शन करण्यात आले.