शहरातील अनधिकृत बॅनर हटविण्याबाबत कार्यवाही करणार!

0

चाळीसगाव । शहरातील बेकायदा बॅनर हटवावे, या मागणीसाठी जनआंदोलन खानदेश विभागातर्फे आज नगरपालिका परिसरात धरणे आंदोलन करण्यात. 26 मार्च रोजी यासंदर्भात निवेदन देऊन धरणे आंदोलनाचा इशारा जनआंदोलनतर्फे देण्यात आला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, बॅनर हटविण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्याधिकार्‍यांनी पत्राद्वारे दिले आहे.

आवाहनानंतर आंदोलन मागे
मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव शहरात सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करीत बेकायदेशीर रित्या डिजिटल बॅनर लावले जात असून त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. आठ दिवसात शहरातील बेकायदा डिजिटल बॅनर नगरपालिका प्रशासनाने हटविले नाहीतर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून नगरपालिका प्रशासन चाळीसगाव यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याबाबत तसेच धरणे आंदोलन करण्याबाबत कळविले होते. मुख्य रहदारीच्या चौकांमध्ये वळण रस्त्यावर शक्यतोवर डिजिटल बॅनर आणि डिजिटल स्क्रीन लावू देण्यास परवानगी देऊ नये, बॅनरसाठी नगरपालिकेची पावती फाडणे गरजेचे करून ती पावती डिजिटल बॅनवरर दर्शनी भागात लावावी, मुदतीतच बॅनर ठेवू द्यावे, मुदत संपल्यावर बॅनर न काढल्यास नपाने त्या विरोधात दंडात्मक कारवाई करून स्वतःहून ते बॅनर काढून घ्यावे, एकच व्यकती, संस्था, पक्ष किंवा संघटनेस शहरात तीन किंवा चार बॅनर लावले जाती याची ताकीद द्यावी, आदी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, अर्जाची दखल घेऊन नगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही केलेली आहे, यासह आता अर्जमधील सूचनांनुसार यापुढेही कार्यवाही केली जाईल, आपण आजचे धरणे आंदोलन मागे घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले.. निवेदनावर विजय शर्मा, प्रा. गौतम निकम, योगश्‍वर राठोड, नासिरभाई शेख, आबा गुजर, विवेक चौधरी, अरूण पाटील, दशरथ शार्दुल, नरेंद्र कापडे, निलेश महाले, सतिष देशमुख, जयदीप पाटील, विनोद राठोड, एकनाथ चौधरी, अ‍ॅड. विलास बडगुजर, मनोहर दुधे आदी उपस्थित होते.