शहरातील अनधिकृत होर्डिंग तातडीने काढा

0
महापौर जाधव यांनी दिले आदेश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग तातडीने काढण्यात यावे, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच अनधिकृत होर्डिंग लावणार्‍या ‘एजन्सी’वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. पुण्यात स्त्याच्या कडेला उभे केलेले अवजड होर्डिंगचा संपूर्ण सांगाडा अचानकपणे रस्त्यावर कोसळून त्याखाली येऊन चौघांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, सहा रिक्षा, एक दुचाकी आणि एका कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी आकाशचिन्ह परवाना विभाग आणि जाहिरातदारांची तातडीने बैठक घेतली. त्यांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे निर्देश दिले. विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय खोराटे बैठकीला उपस्थित होते.
परवानगी घेऊन लावावे
महापौर राहुल जाधव म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळ्यात होर्डिंग व्यवस्थित न लावल्याने अंगावर होर्डिंग पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परवानगी घेऊनच व्यवस्थित होर्डिंग लावण्यात यावेत. फलक, होर्डिंग लावण्याबाबत धोरण ठरविण्यात यावे. शहरातील सर्व अनधिकृत फलक, होर्डिंग तातडीने काढण्यात यावेत. त्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात यावी. अनधिकृत फलक, होर्डिंग लावणार्‍या एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कारवाईसाठी याबाबत पोलीस आयुक्तालयाकडून बंदोबस्त मागवून घेण्यात यावा. तसेच महापालिकेमार्फत होर्डिंग लावण्याचे धोरण ठरविण्यात यावे. धोरण ठरविल्यास पालिकेला उत्पन्न देखील मिळेल.