छावा मराठा संघटनेचा आंदोलनाचा इशारा
नवी सांगवी : पिंपरी-चिंचवड शहरात खुलेआम सुरु असलेल्या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी वहावत चालली आहे. ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत, त्या परिसरातील महिलांना घराबाहेर पडणे जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे शहर उपनगरांतील अवैध धंद्यांना लवकरात लवकर आळा घालावा. अन्यथा प्रजासत्ताक दिनानंतर आंदोलन छेडण्याचा इशारा छावा मराठा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम जाधव यांनी पोलीस आयुक्तांना शहर व उपनगरांतील अवैध धंदे बंद करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. तसेच राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, डी.जी.पी.पडलसगीकर यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
हे देखील वाचा
अवैध धंद्यांविरोधातील कारवाई थंडावली
या निवेदनात राम जाधव यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरासाठी नव्याने पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली. पोलीस आयुक्तांनी सुरुवातीला अवैध धंद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे नागरीकांमधून आनंदाचे वातावरण होते. मात्र, काही दिवसात ही कारवाई थंडावल्यामुळे पुन्हा अवैध धंद्यांनी डोके वर काढले. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारी आटोक्यात राहावी, अवैध धंदे चालू नयेत, हाच स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मितीमागील उद्देश होता. मात्र, सद्यःस्थितीला या उद्देशालाच हरताळ फासण्याचा प्रकार सुरु आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. किराणा मालाची दुकाने थाटल्याप्रमाणे जुगाराचे आणि मटक्याचे अड्डे सुरु झाले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसूलदार म्हणून नेमलेले पोलीस या अवैध धंद्यांना परवानगी देत सुटले आहेत. निगडी आणि चिखली पोलीस ठाण्यांतर्गत परिसरात पानटपरीवाल्यांकडून शिवीगाळ व मारहाण करून वसुली करीत आहेत.