शहरातील अस्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा विषय ‘स्थायी’त गाजला

0

धुळे । नगरोत्थान योजनेतंर्गत मिळालेल्या निधीतून मालेगावरोड ते बायपास हायवे दरम्यान 100 फुटी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामानंतर बचत झालेल्या निधीतून मिलपरिसरातील वैभव नगर संभाप्पा कॉलनी ते लिलाबाई चाळ आणि पुढे निसर्ग उपचार केंद्र ते भाईजी नगर असा 100 फुटी रस्ता तयार करण्याच्या विषयाला तहकुब करण्यात आले. शिवसेना नगरसेवक संजय जाधव आणि महानगरप्रमुख सतिश महाले यांनी हा प्रस्ताव मांडला होता. मनपा स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज 10 रोजी मनपा सभागृहात झाली. यावेळी स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांच्यासह सर्व पक्षीय स्थायी समिती सदस्य यावेळी उपस्थितीत होते.

स्थायीत मांडण्याचा सल्ला
हा रस्ता नेमका कोणत्या जागेतून जाणार आहे, त्या जागेवर अतिक्रमण आहे काय, खासगी जागा भुसंपादन करावी लागेल काय याची विचारणा करीत यावर आधी नगर रचना विभागाचा अहवाल घेण्यात यावा अशी मागणी केली. सविस्तर अहवाल घेऊन तो स्थायी समितीत मांडावा त्यानंतरच या नव्या 100 फुटी रस्त्याच्या कामास मंजूरी द्यावी अशी सुचना यावेळी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केली. यामुळे स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांनी हा विषय तहकुब करीत असल्याचे जाहिर केले.

राष्ट्रवादीचा आक्षेप
या सभेत प्रामुख्याने नगरोत्थान योजनेतंर्गत मिळालेल्या निधीत बचत झाली असून त्या वाचलेल्या पैशातून मिलपरिसरातील वैभव नगर, संभाप्पा कॉलनी ते लिलाबाई चाळ आणि पुढे निसर्ग उपचार केंद्र ते भाईजी नगर असा 100 फुटी रस्ता तयार करण्याचा विषय नगरसेवक संजय जाधव आणि सतिश महाले यांच्या पत्रानुसार मंजूरीसाठी मांडला गेला. मात्र राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक शेलार, साबिर सय्यद यांच्यासह काही जणांनी त्यास आक्षेप नोंदवला.

नगरसेवकांची नाराजी
सभेत मायादेवी परदेशी यांनी शहरासह त्यांच्या प्रभागात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला. रेागट खुजलीवाल्या कुत्र्यांचा लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून यावर आरोग्य विभागाने त्वरीत उपाय योजना कराव्या अशी मागणी त्यांनी केली. चित्रा दुसाणे यांनी अस्वच्छतेचा मुद्या मांडला. नगरसेवक साबीर सय्यद यांनी पाणी पुरवठा आणि विकासकामे होत नसल्यावर नाराजी व्यक्त केली. इस्माईल पटेल यांनीही नगरसेवकांचे स्थायी समिती सदस्यांचे कोणतेही काम केले जात नसून लोकांमध्ये रोष निर्माण होत असल्यावर तीव्र भावना व्यक्त केल्या.