शहरातील आठवडे बाजारास बंदी; पिंप्राळा बाजारात दुकाने थाटल्यास होणार कारवाई

0

जळगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे शहरातील आठवडे बाजार भरण्यास बंदी करण्यात आली आहे. मात्र मंगळवारी भरणारा हरिविठ्ठल नगर, बुधवारी पिंप्राळा आणि शनिवारी भरणारा आठवडे बाजारात विक्रेते कोणतीही खबरदारी न घेता गर्दी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये शहरातील संपूर्ण भागातील आठवडे बाजारास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान मंगळवारचा हरिविठ्ठलचा बाजार प्रशासनाने रोखला असून उद्या दि.13 रोजीचा पिंप्राळा येथील बाजारात भाजी विक्रेत्यांनी गर्दी केल्यास कारवाई करण्यात येण्यात येणार असल्याचा इशारा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिला आहे.

शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनासारख्या विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहेत. तरीदेखील विक्रेत्यांसह नागरिकांना गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे गर्दी करु नये असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

हरिविठ्ठल नगरात पथक ठाण मांडून
मंगळवारी भरणार्‍या हरिविठ्ठल नगरातील बाजारात काही भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटण्यासाठी सुरुवात केली होती मात्र उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक दुपारी त्याठिकाणी पोहोचून बाजार भरण्यास मनाई केली. दरम्यान दोन ते अडीच तास त्याठिकाणी पथक ठाण मांडून हरिविठ्ठल नगरचा बाजार रोखला.