शहरातील कचरा रोजच्या रोज उचलावा

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील कचरा रोजच्या रोज उचलण्याबाबत आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयाने तातडीने उपाय योजना कराव्यात, अशा सूचना महापौर नितीन काळजे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. महापौर काळजे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक लक्ष्मण उंडे, शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, विजय खोराटे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, प्रशासन अधिकारी रवींद्र जाधव, स्वाती चिंचवडे, सहाय्यक आरोग्याधिकारी गणेश देशपांडे, के. डी. दरवडे, उपअभियंता सी. एन. धानोरकर, एस. एन. वाघ, एन. पी. पाटील आदी उपस्थित होते.

विविध कामांचा आढावा
या बैठकीत, शहरातील विविध प्रभागातील कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक करणे, रोज किती टन कचरा गोळा केला जातो, कचर्‍याची विल्हेवाट कशी लावली जाते, तसेच कचरा उचलण्याच्या कामासाठीच्या निविदा प्रक्रियेची स्थिती यासह आरोग्य विभागातील इतर कामकाजाबाबतही आढावा घेण्यात आला. पिंपरी भाजी मंडई येथे मोठ्या प्रमाणात साठलेल्या कचर्‍याची तातडीने विल्हेवाट लावण्यात यावी. तसेच शहरातील सर्व ठिकाणचा कचरा रोजच्या रोज उचलला जावा, यासाठी आरोग्य विभागाने यंत्रणा सक्षम करावी, अशा सूचना यावेळी महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.