शहरातील गल्लीबोळात अवैध व्यवसाय सुरु

0

धुळे । पंधरा दिवसाच्या अंतराने दोन खून, गँगवार, खंडणीसाठी झाशी राणी चौकातील व्यापार्‍यांचे गुंडांनी दुकान जाळणे, व्यापार्यांना धमकावणे, सट्ट्यासह अवैध व्यवसाय शहरातील गल्लीबोळात सुरु आहे. टवाळखोरांमुळे शाळकरी मुलींसह कॉलेज तरुणी, महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनातर किरकोळ मानल्या जातात. हे सर्व चित्र बदलण्याची ज्यांची जबाबदारी आहे, ज्यांनी प्रत्येक निवडणुकीत गुंडगिरीमुक्त धुळे शहर अशी साद दिली होती, ते आमदार आहेत कुठे? असा सवाल राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी केला आहे. मनोज मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,परवाच अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांना आझादनगर भागातील भाजपच्या महिला व तरुणांनी अतिशय हाताबाहेर गेलेली भागातील परिस्थिती मांडली. भांग-गांजा, बनावट दारू, सट्टा-मटका-पत्त्यांचा क्लब व अजून नको ते व्यवसाय राजरोसपणे त्यांच्या भागात चालू आहेत. त्यामुळे त्या भागातील जनतेला अतिशय वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो.

तरूणी निमूटपणे सहन करताहेत
कॉलेज-शाळा व ट्यूशनला जाणार्‍या तरुणींचा पिछा करायचा ट्रिपल-ट्रिपल सीट मोटारसायकलीवर अतिशय वेगात स्टंटबाजी करायची,कर्कश हॉर्न वाजवायचे, यामुळे छोटे-मोठे अपघात या परिसरात नेहमीच घडतात. तरुणीदेखील निमूटपणे हे प्रकार सहन करतात. कारण, हे प्रकार घरी सांगितले तर उगाच बदनामी नको, म्हणून पालक मुलींचे शिक्षण अर्धवट सोडायला लावून घरीच बसायला लावतात व प्रसंगीलवकर मुलींचे विवाह उरकवून जबाबदारीतून मुक्त होतात.

तुम्ही या विषयावरच बोला
आ.गोटे निवडणुकीतील भाजपच्या व तुमच्या जाहीरनाम्यात गुंडगिरीमुक्त व भयमुक्त, दहशतमुक्त धुळे शहराची संकल्पना राबवण्यासाठी धुळेकर जनतेला तुम्ही घातलेली भावनिक साद व तेवढ्याच विश्‍वासाने धुळेकर जनतेने तुमच्या झोळीत मतांची भिक घातली. परंतु, धुळेकर जनतेच्या पदरी निराशाच आली. आ. गोटे आता तुम्ही या विषयावरच बोला. धुळे शहरात महाविद्यालयीन तरुणींची होणारी छेडखानी, हा रोजचाच कार्यक्रम झाला आहे. शहरातील महाविद्यालयाच्या परिसरातीत रोज या टवाळखोर गुंडाकडून तरुणीची छेडखानी केली जाते. हे गुंड, टवाळखोर इतके मुजोर आहेत की यांना एखाद्या नागरिकाने समजवण्याचा प्रयत्न केला तर त्या नागरिकाला मारहाणदेखील हे गुंड करतात.

गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता असताना बिनदिक्कतपणे चालणारे हे व्यवसाय : प्रत्येक निवडणुकीत अवैध व्यवसायमुक्त धुळे शहराची डरकाळी फोडणारा वाघ(?) देखील भाजपचाच. तरीही शहरात हे प्रकार. अवैध व्यवसाय हे राजरोसपणे चालतात ही भाजपाची हतबलता व आ. गोटेंचा नैतिकदृष्ट्या पराभव आहे.गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता असताना बिनदिक्कतपणे चालणारे हे व्यवसाय आमदारांच्या आशिर्वादाशिवाय चालूच शकत नाही, हे सत्य आता जनताही स्वीकारू लागली आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक मनोज मोरे यांनी केला आहे. आ. गोटे प्रत्येक निवडणुकीत, जाहीरनाम्यात गुंडगिरीमुक्त व भयमुक्त धुळे शहर. परंतु या विषयांत तुम्ही 100 टक्के अपयशी ठरत आहे. कारण, धुळे शहरात रोज गुंडाच्या टोळ्यांकडून होणारी दहशत व व्यापार्यांना धमकावून, प्रसंगी मारहाण करून वसूल होणारी खंडणी. काही व्यापार्‍यांनी बिदागी (हप्ता) देण्यास नकार दिला, म्हणून व्यापार्‍यांचे लाखो करोडोच्या मौल्यवान मालासह दुकान जाळण्याचा प्रकार नुकताच शहरात झाशी राणी पुतळ्याजवळ चौकात घडला. पंधरा दिवसांच्या अंतराने धुळे शहरात दोन खून झाले.साक्रीरोड परिसरात गुटक्याच्या पुडीवरून एका तरुणाचा खून झाला. दुसरा खून गोपाल टी हाऊसजवळ टोळी युद्धातून झाला.

जाहीरनाम्यातील एकही वचन तुम्ही नाही पाळले
धावपळीच्या या युगात महिलांना शिक्षण असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा बाजारासाठी घराबाहेर पडावेच लागते. परंतु, या माय-माऊल्या इतक्या भेदरलेल्या आहेत की घराबाहेर पडणे जरी खूप गरजेचे असले, तरी घराबाहेर निघताना सौभाग्याचे लेणे, सुहागण असल्याची विवाहित असल्याची निशाणी मंगळसूत्र एकतर घरी काढून यावे लागते किंवा बाजारात जाताना एक हात तिच्या मंगलपोतवर असतो. कारण, दररोज वेगवेगळ्या भागांत मंगलसूत्र तोडून पळाल्याचे गुन्हे पोलिस दरबारी दाखल होतात. सकाळी आणि सायंकाळी थोडासा विरंगुळा व हातपाय मोकळे करावे म्हणून घराबाहेर पडलेल्या आजीबाई सुरक्षित घरी येण्याची खात्री नाही. परंतु, या दागिन्यांवरदेखील या गुन्हेगारांचा डोळा असतोच. आ. गोटे तुम्ही दिलेल्या जाहीरनाम्यातील एकही वचन तुम्ही पाळलेले नाही, अशी टीकाही मनोज मोरे यांनी केली आहे.