शहरातील चर्चमध्ये प्रभु येशूंचा जन्म सोहळा उत्साहात!

0

जळगाव । नाताळचा सण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त शहरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील चर्चमध्ये प्रभु येशूंचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला. यासाठी शहरातील चर्चची आकर्षक सजावट करण्यात आली होती. नाताळ उत्सवानिमित्त शहरातील सर्वच चर्चला विद्युत रोषणाईसह प्रवेशद्वारावर येथू ख्रिस्त यांच्या प्रतिमेजवळ देखील सजावट करण्यात आलेली होती. अनेक चर्चमध्ये रंगरंगोटी देखील करण्यात आली आहे.

स्वच्छतेचा संदेश
आनंद आणि उत्साहाचं प्रतिक असलेला ख्रिसमस संपूर्ण ख्रिश्‍चन समाजाचा सर्वात मोठा सण आहे. चर्चमध्ये प्रभू येशूच्या आगमनाचं गीत गायन करण्यात आले. यानंतर चर्चच्या फादरनी सर्वांना आशीर्वाद देवून, ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. यासोबत स्वच्छता राखा असा संदेशही त्यांनी दिला. अलायन्स चर्चमध्ये शहरातील ख्रिस्ती बांधवांनी सकाळी नाताळ सण साजरा केला. तसेच रामानंदनगर परिसरातील सेंट थॉमस चर्चमध्येही येशूची भक्ती करुन जन्मसोहळा साजरा करण्यात आला. दिवसभर दर्शनासाठी, प्रार्थनेसाठी भाविकांकरिता चर्च खुले होते. यावेळी कॅरल हा गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला.

शुभेच्छांचा वर्षाव
जगभरात नाताळ सण साजरा करण्यात येत असतो. गेल्या आठवड्याभरापासून याची तयारी सुरु होती. ख्रिसमच्या खरेदीनिमित्त दुकानात मोठी गर्दी होती. शाळा, महाविद्यालयात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. दरम्यान ख्रिसमस निमित्त सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. लिखीत, चित्ररुपी शुभेच्छापर संदेश सोशल मिडीयाद्वारे देण्यात आले.

असे आहेत कार्यक्रम
पांडे डेअरी चौकातील अलायन्स चर्चमध्ये सकाळ व संध्याकाळ उपासना करण्यात आली तसेच नाताळ सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. 28 रोजी संध्याकाळी तरुण संघातर्फे कार्यक्रम, 29 रोजी खेळ, 30 रोजी बायबल क्वीज, 31 रोजी उपासना, कॅप फायर, वॉच नाईट सर्विस (साक्ष व प्रार्थना), तर 1 जानेवारी रोजी नूतनवर्ष उपासना, प्रभू भोजन व अर्पण असे कार्यक्रम होणार आहे. या सोबतच रामानंद नगर रस्त्यावरील सेंट फ्रॅन्सिस डी. सेल्स चर्च, मेहरुण तलाव परिसरातील सेंट थॉमस चर्चमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.