शहरातील चार सेवाव्रतींचा होणार गौरव

0

भुसावळ । आपले परिवार सार्वजनिक वाचनालयातर्फे तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या संस्था आणि व्यक्तींना साने गुरूजी गौरव पुरस्काराने गौरवले जाणार आहे. यंदाच्या पुरस्कारांसाठी चार जणांची निवड झाली आहे. त्यात मुख्याध्यापक घन:श्याम चौधरी, अरूण मांडळकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.नी.तु.पाटील आणि शिक्षिका लता चौधरी या मान्यवरांचा समावेश आहे.

पुरस्कारार्थ्यांमध्ये यांचा आहे समावेश
सहा दशकांपुर्वी ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची गंगोत्री प्रवाहित करणार्‍या किन्ही येथील स्थानिक एज्युकेशन सोसायटीच्या नेतृत्व श्रृंखलेला साने गुरूजी संस्था गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. तर साकेगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक घन:श्याम चौधरी यांना मुख्याध्यापक गौरव, अरुण मांडळकर यांना शिक्षण सेवा गौरव, वरणगाव येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.नी.तु.पाटील यांना समाजसेवा गौरव, तर बर्‍हाटे विद्यालयाच्या शिक्षिका लता चौधरी यांना शिक्षक गौरव पुरस्काराने गौरवले जाणार आहे.

प्रस्ताव न मागवता प्रातिनिधिक स्वरुपात निवड
वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रमोद सरोदे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. कुठलाही प्रस्ताव न मागवता प्रातिनिधिक स्वरूपात पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे. जुलैला गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.