डोंबिवली : शहरातील डाक विभागाच्या टपालपेट्यांची दुरवस्था झाली असून त्याभोवती कचरा साचला आहे.शिवाय पावसाचे पाणी पेट्यांत जाण्याची भीती आहे.
संवाद क्षेत्रात मोठी क्रांती झाल्यामुळे टपालाचे महत्त्व कमी होत आहे. त्यातच खासगी कुरिअर सेवेचा उपयोग करणा-यांची संख्या वाढल्यामुळे टपालसेवेचा उपयोग करणा-यांची सख्याही कमी होत आहे. अशा परिस्थितीत खासगी कुरियर सेवेला टक्कर देण्यासाठी टपाल खाते वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचा विचार करीत आहे. मात्र, दुसरीकडे पोस्ट विभागाला आपल्या टपालपेट्यांचा विसर पडलेला दिसतो आहे. पोस्टाने शहरात ३४ ठिकाणी टपालपेट्या लावलेल्या आहेत. मात्र, देखभालीअभावी या पेट्यांची सध्या दुरवस्था झाली आहे. ई-मेल, फोन आणि मोबाइलच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाल्यामुळे टपालाचे महत्त्व कमी झाले आहे; परंतु अजूनही शासकीय आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची देवाण-घेवाण पोस्टाच्या सेवेद्वारेच केली जाते. या पोस्टाची खरी ओळख असलेल्या टपालपेट्यांची सध्या वाईट अवस्था झाली आहे. शहराच्या विविध भागांत लावलेल्या या पेट्यांमध्ये तुम्ही तुमचे पत्र टाकले की निश्चिंत व्हावे, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. या टपालपेट्यांची अवस्था पाहिली तर या पेट्यांचा उपयोग होत असेल का? असाच प्रश्न या टपाल टाकणा-यांपुढे उभा राहतो. कारण सध्या या पेट्यांची अवस्था फारच वाईट झाली आहे. पोस्ट खात्याने शहरात विविध ठिकाणी ४० टपालपेट्या बसवल्या आहेत. मात्र, या पेट्या बसवल्यानंतर पोस्टाने त्यांच्याकडे पुन्हा लक्षच दिले नाही. त्यामुळे यापैकी अनेक पेट्या सध्या गंजल्या आहेत. काही पेट्यांचा पत्रा निघाल्यामुळे त्या कधीही मोडून खाली पडू शकतात, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
काहींभोवती कच-याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे त्यांचा वापर कसा करावा, असा प्रश्न निर्माण होतो आहे. टपालपेट्यांची दुरवस्था झाल्यामुळे यात टाकलेल्या टपालांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. गंजलेल्या पेट्यांमुळे पावसाचे पाणी या पेट्यात जाण्याची शक्यता असते.शिवाय काही ठिकाणी पेट्या कचराकुंड्याशेजारी असल्यामुळे कचरा पेटवल्यामुळे या टपालपेट्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरच नवीन पेट्या- शहरातील काही टपाल पेट्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नवीन पेटयांची मागणी आम्ही ठाणे कार्यालयाकडे केली आहे. लवकरच आम्हाला नवीन टपाल पेट्या मिळतील. – आर. एस. चौहान पोस्टमास्तर, डोंबिवली