शहरातील तिसरे ई-कचरा संकलन केंद्र भेळ चौकात सुरु

0

शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज

पिंपरी : प्रत्येक प्रकारच्या कचर्‍याची जर योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही तर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचालित पोलिस नागरिक मित्र महाराष्ट्र राज्य आणि पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरातील तिसरे ई-कचरा संकलन केंद्र प्राधिकरणातील भेळ चौकात ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयासमोर सुरु करण्यात आले. हे संकलन केंद्र प्रत्येक महिन्याचा तिसर्‍या रविवारी सुरु राहणार आहे.
या ई-कचरा संकलन केंद्राचे रविवारी (दि. 22) उद्घाटन झाले. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते. ई-कचर्‍याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे वेळीच त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. नागरिकांमध्ये ई-कचर्‍याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शैलजा मोरे आणि अमित गावडे यांनी यावेळी सांगितले.

दुरूस्तीकरून सामाजिक संस्थांना
ई-कचरा काही भंगारवाले घेतात, तर काही घेत नाहीत. जे भंगारवाले ई-कचरा घेतात, त्यांच्याकडे या कचर्‍याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा नसते. त्यामुळे ते हा सर्व कचरा जाळतात. त्यामुळे कचर्‍यामध्ये असलेले विषारी वायू हवेत पसरतात आणि त्याचा परिणाम हवा प्रदूषण होऊन नागरिकांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे नागरिकांनी ई-कचरा भंगारवाल्यांना न देता त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणार्‍या संस्थांना देण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण बोर्डाने पुण्यातील जनवाणी या सामाजिक संस्थेला अधिकृत मान्यता दिली आहे. ही संस्था शहरातील विविध भागांमधून ई-कचरा जमा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावते. तसेच जमा करण्यात आलेल्या कचर्‍यातून दुरुस्ती करून वापरण्यात येण्याजोगे साहित्य सामाजिक संस्था आणि गरजवंतांना देण्यात येते. त्यामुळे नागरिकांचा ई-कचरा संकलनातील सहभाग हा एखाद्या गरजवंताला मदत देखील ठरू शकतो.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड, नवी दिल्लीद्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात 2005 साली भारतात 1.47 लाख मेट्रिक टन ई-कचरा जमा करण्यात आला. 2012 साली 8 लाख मेट्रिक टन कचरा जमा करण्यात आला. पुणे शहरातून दरवर्षी 2 हजार 584.2 टन इलेक्ट्रॉनिक कचरा जमा करण्यात येतो. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या कचर्‍याचे प्रमाण वाढत असले तरी देखील शास्त्रीय पद्धतीने त्याची विल्हेवाट लावून पुनःनिर्मिती करण्यात येत असल्याने त्याचा फायदा होत आहे. मात्र, शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट लावली नाही तर याचा फार मोठया प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो.

काय असतो ई-कचरा
ई-कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा. घरात, कार्यालयात, परिसरात जेवढ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर होत आहे, तो सर्व निकामी कचरा ई-कचरा आहे. त्यामध्ये वायर, मोबाईल चार्जर, लॅपटॉप चार्जर, साउंड सिस्टम, वॉटर कुलर, मिक्सर, इस्त्री, पंखे, बंद दिवे, प्रिंटर, की-बोर्ड, युपीएस, कॅसेट्स, टेलिफोन, व्हॅक्युम क्लीनर, बॅटरी, स्टॅबिलायजर्स, टीव्ही, कॅमेरा आदींचा समावेश होतो.

जनजागृतीसाठी सोशल मीडिया
ई-कचरा संकलनासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी फेसबुक, व्हाट्स अप आणि अन्य तत्सम सोशल साईट्सच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचणे सुरु आहे. पोलीस नागरिक मित्र महाराष्ट्र राज्य आणि पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम या संस्थांचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यामातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. नागरिकांना ही संकल्पना आवडल्यामुळे भेळ चौकातील केंद्राला पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशी तब्बल 70 किलो ई-कचरा जमा करण्यात आला आहे.

शहरात तीन संकलन केंद्र
पिंपरी-चिंचवड शहरात तीन ई-कचरा संकलन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यामध्ये पहिले पिंपळे सौदागरमधील रोजलँड सोसायटीमध्ये, दुसरे यमुनानगरमधील तुळजाभवानी मंदिराजवळ आणि तिसरे निगडी प्राधिकरणातील भेळ चौकात अ क्षेत्रीय कार्यालयासमोर सुरु करण्यात आले आहे. यमुनानगरमधील ई-कचरा संकलन केंद्र डिसेंबर 2017 मध्ये सुरु करण्यात आले. हे केंद्र प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी सुरु असते. निगडी, आकुर्डी, प्राधिकरण आणि परिसरातील नागरिकांनी यमुनानगरकडे जाणे दूर होत असून प्राधिकरण भागात एखादे केंद्र सुरु करण्याची मागणी केली. त्यामुळे लोकाग्रहास्तव शहरातील तिसरे केंद्र भेळ चौकात रविवारपासून सुरु करण्यात आले आहे.