पिंपरी-चिंचवड : शहरातील 797 शाळांतील तीन लाख 40 हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या 15 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. गोवर आणि रुबेला हे आजार होऊच नये आणि झालेच तर त्यांची तीव्रता कमी व्हावी म्हणून लस दिल्या जातात. राज्यात 27 नोव्हेंबरपासून हे लसीकरण सुरू झाले आहे. शहरातील वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ही लस दिली जात आहे.
मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे
गोवर हा विषाणुंमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. रुबेला हा आजार गर्भवतींना पहिल्या तीन महिन्यांत होण्याचा धोका असतो. त्याचा दुष्परिणाम थेट गर्भावर होतो. गर्भाच्या डोक्याचा आकार कमी होणे, मतिमंदत्व, मोतीबिंदू, बहिरेपणा आणि हृदयाचे आजार त्यातून उद्भवतात. त्याला प्रतिबंध करण्यासाठी ही लस अत्यावश्यक असल्याचे भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितले. हे आजार आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे असते. लसीकरणाचे प्रमाण सातत्याने 83 ते 94 टक्के असावे लागते. जबाबदारी म्हणून सर्व पालकांनी आपल्या मुलांना ही लस आवर्जून द्यावी, असे आवाहनही डॉ. जोग यांनी केले आहे.
लस सुरक्षितच
‘एमआर’ लस देणे सुरक्षित आहे. या लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. लसीकरणाशी संबंधित सर्व यंत्रणा आणि मनुष्यबळ प्रशिक्षित आहे. पालकांनी आपल्या मुलांना ही लस निःशंकपणे द्यावी. अनेक राष्ट्रांमधून गोवर, रुबेला हे आजार हद्दपार होत आहेत. त्यात आपल्याला मागे राहून चालणार नाही, असेही बालरोगतज्ज्ञ डॉ. जोग यांनी सांगितले.
797 शाळांमध्ये लसीकरण
शहरातील एक हजार 320 पैकी 797 शाळांमधील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यातून तीन लाख 39 हजार 819 विद्यार्थ्यांना लस दिली आहे. डॉ. अमित शहा, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका