शहरातील दारू अड्ड्यांवर पोलिसांचा छापा

0

जळगाव । स्थानिक गुन्हे शाखा पथक व एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर छापा मारीत 36 हजार 759 रुपयांची बनावट व देशी दारू जप्त केली आहे. यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाने चार ठिकाणी तर एमआयडीसी पोलिसांनी एका ठिकाणी छापा मारला आहे. याप्रकरणी सात जणांविरूध्द कारवाई करण्यात येवून त्यांच्याविरूध्द पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर बनावट व देशी दारूसह दारू बनविण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत.

पथकात यांचा होता समावेश
गणपती विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आदेश दिले होते. त्यानुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक राजेशसिंह चंदेल यांना शहरात चार ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर पोनि. चंदेल यांच्या पथकातील दिलीप येवले, चंद्रकांत पाटील, दिनेश बडगुजर, अशोक चौधरी, लिलाकांत महाले, विजय पाटील, शिवाजी पाटील, श्रीकृष्ण पटवर्धन, सतिश हाळणारे, रविंद्र घुगे, दत्तात्रय बडगुजर, नरेंद्र वारूळे, संदीप साळवे, दर्शन ढाकणे, प्रविण हिवराळे, विनायक पाटील, महेश पाटील आदी कर्मचार्‍यांना सुरू असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईसाठी पाठविले.

या ठिकाणी मारला छापा
सर्वप्रथम पथकाला मिळालेल्या माहिती नुसार आर.एल.चौफुलीजवळ सुरू असलेल्या अवैध दारू विक्री होत असलेल्या अड्ड्यावर पथकाने छापा मारला. त्यात पथकाला मोहन पुरूषोत्तम खर्चे व गणपत चिंतामण डांगे दोन्ही रा. सागर ढाबा हे 10 हजार 647 रुपयांची देशी व विदेशी दारू बाळगतांना मिळून आले. पथकाने लागलीच दोघांवर कारवाई करत दारू जप्त केली. यानंतर एमआयडीसी हद्दीतच सुप्रिम कॉलनी कंजरवाडा येथे दारू अड्ड्यावर पथकाने छापा मारला. त्यावेळी गुल्लु बहादुर कंजरभाट व गणेश लक्ष्मण वानखेडे हे 9 हजार 48 रुपयांची देशी दारू बाळगतांना मिळून आले. दोघांनवर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येवून माल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आपला मोर्चा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वळवून शिवाजी नगर भागातील खडके चाळसमोर अवैधदारू विक्री होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी ठिकाणी जावून पथकाने छापा मारला. कारवाईत त्या ठिकाणी राकेश मधुकर पाटील रा. गेंदालालमिल हा 2 हजार 652 रुपयांची देशी दारू विक्री करतांना मिळून आल्यानंतर पथकाडून त्याच्यावर कारवाई करण्यात येवून दारू जप्त करण्यात आली. यानंतर चौथ्या कारवाई पथकाने गेंदालालमिल समोरील रस्त्यावर सुरू असलेल्या अड्ड्यावर धाड टाकत संजय नामदेव कोळी याला 2 हजार रुपयांची देशी दारू विक्री करतांना पकडले व कारवाई केली. अशा एकूण चारही कारवाईत पथकाकडून 6 जणांवर कारवाई करण्यात येवून 25 हजार 139 रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.

एमायडीसी पोलिसांची कारवाई
कंजरवाडा परिसरातील जाखनीनगर येथे उषा यशवंत कंजर ही महिला विना परवाना देशी, विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोनि. कुराडे यांनी त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक रोहन खंडागळे, शरद भालेराव, किशोर राजाराम पाटील, सचिन मुंडे, अविनाश देवरे, प्रविणा जाधव आदी कर्मचार्‍यांना कारवाईसाठी पाठविले. पथकाने लागलीच कंजरवाड्यातील जाखनीनगर येथे जावून पाहणी केल्यानंतर उषा कंजर हि महिला विनापरवाना दारू विक्री करत असल्याचे पथकाला दिसून आले. मात्र, पोलिस आल्याची चुनूक महिलेला लागल्यानंतर दारू बनविण्याचे साहित्य सोडून महिला तेथून पळाली. यानंतर पथकाने महिलेचा पाठलाग केला परंतू, महिला ही गल्ली-बोळाचा फायदा घेत पसार झाली. पथकाने महिलेचे दारू बनविण्याचे साहित्य तसेच दारू असे एकूण 11 हजार 620 रुपयांची दारू जप्त करून महिलेविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.