शहरातील पवना नदीच्या प्रदुषणात झाली वाढ

0

नदीमध्ये सांडपाणी आणि मैलामिश्रित पाणी तसेच सोडले

सांडपाण्याच्या तुलनेत मलनिःस्सारण प्रक्रिया केंद्रे अपुरी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील जीवनदायिनी असलेल्या पवना नदीला दिवसेंदिवस जास्त प्रदुषण वाढते आहे. शहरातील वाढते औद्योगिकीकरणामुळे, वाढते नागरिकीकरण यामुळे शहरातील पवना नदीमध्ये सांडपाणी आणि मैलामिश्रित पाणी तसेच सोडले जाते. हे मैलामिश्रीत वाढलेल्या पाण्याच्या प्रमाणामुळे नदीतील पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. ही नदी नसून गटारगंगा झाली आहे. पवना नदीतील पाणी दुर्गंधीत, प्रदूषित व गटारमय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने नदीपात्रात सोडले जाणारे लाखो लिटर सांडपाणी व मैलापाणी पाण्यावर प्रक्रिया होत नसल्याचे दिसत आहे. या पाण्यावर पिंपरी-चिंचवडकरांचा अधिकार असला तरी ठिकठिकाणी सोडलेल्या सांडपाण्यामुळे हे पाणी खुपच प्रदुषित झाले आहे. शहरात निर्माण होणारे सांडपाणी आणि मैलापाण्याच्या तुलनेत कार्यरत असलेली मलनिःस्सारण प्रक्रिया केंद्रे अपुरी आहेत.

पाणी तसेच सोडले जाते
पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये अनेक औद्योगिक वसाहती आहेत. या वसाहतींमधून सांडपाणी नदीत सोडले जाते. बोपखेल, ताथवडे, थेरगाव, पिंपरी येथील नाल्याचे पाणीदेखील थेट नदीपात्रात मिसळत असल्याने पवनेचे पाणी प्रदूषित होत आहे. रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरातून 24.5 किलोमीटर अंतरात पवना नदी वाहते. पवना नदी किवळे, रावेत येथे शहरात प्रवेश करून चिंचवड, पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी मार्गे सांगवी, दापोडी-हॅरिस पुलाजवळ मुळा नदीला मिळते. वाल्हेकरवाडी येथील जाधव घाट लगत असणार्‍या नाल्यातून पवना नदीपात्रात थेट नाल्याचे पाणी मिसळत असल्याचे पाहणीत आढळले.

सांडपाण्यावर प्रक्रीया होत नाही
शहरातील झोपडपट्ट्यांमधून जमा होणारे सांडपाणी थेट नाल्यांमध्ये मिसळले जाते. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सध्या शहरामध्ये 9 ठिकाणी 13 मैलाशुद्धीकरण केंद्र आहेत. शहरातील दरडोई पाणीपुरवठ्याचा दर, वाढती लोकसंख्या, यातून निर्माण होणारे सांडपाणी आणि मैलापाण्याच्या तुलनेत कार्यरत असलेली मलनिःस्सारण प्रक्रिया केंद्रे अपुरी आहेत. शहरात टाकलेल्या मलनिःस्सारण नलिकांची लांबी 1472 कि.मी. इतकी असून, सध्या प्रक्रिया करण्यात येणारे सांडपाणी दररोज जवळपास 300 दशलक्ष लिटर इतके आहे. दररोज जवळपास 300 दशलक्ष लिटर मैलापाणी निर्माण होते. शहरात सध्या प्रतिदिन 230 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करणारी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे कार्यरत आहेत. उरलेले पाणी थेट नदीत सोडले जाते. महापालिकेने उभारलेल्या प्रकल्पाच्या कार्यक्षमतेबद्दल वाद आहेत. शहरातून निर्माण होणार्‍या मैलापाण्यातील 50 टक्के पाणी थेट नदीत सोडले जात आहे.