शहरातील पहिलीच रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

0

डी. वाय. पाटील रुग्णालयाचा प्रयोग
पिंपरी-चिंचवड : पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय रुग्णालय व संशोधन केंद्रांत ‘डा विन्सी एक्सआय’ कंपनीचे अत्याधुनिक चौथ्या पिढीच्या रोबोटच्या साहाय्याने नुकतीच पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. आंबेगाव येथील 40 वयोवर्षावरील महिलेला दोन आठवड्यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर असे आढळून आले की तिला एका मूत्रपिंडामध्ये 6 सेमी या आकाराचा काटेरी व शिंगांसारखा मूत्रखडा तसेच दुसर्‍या मूत्रपिंडात लहान मूत्रखडे होते. त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित होत नव्हते व फार वेदना होत होत्या. त्यामुळे दुसर्‍या मूत्रपिडामधील मूत्रखडा लेप्रोस्कोपिक सर्जरी द्वारे काढण्यात आले व पहिला मूत्रपिंडातील खड्याचा आकार मोठा असल्याने ते काढण्यासाठी रोबोटिक सर्जरी चा वापर करण्यात आला.

म्हणून वापरले तंत्रज्ञान
ही शस्त्रक्रिया करण्यासाठी शरीरामध्ये 5 मिमीचे पाच छिद्र करून शस्त्रक्रिया करण्यात आली व मूत्रपिंडातील खडा बाहेर काढण्यात आला. हीच शस्त्रक्रिया नेहमीच्या पद्धतीने केली असता जास्त चिरफाड करावी लागली असती व 15सेमीचा कट द्यावा लागला असता. याने संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली असती तसेच जास्त रक्तस्त्राव झाला असता आणि रुग्णाला वेदना पुढे सहन कराव्या लागल्या असत्या आणि रुग्णास आजारपणातून बरे होण्यास व जखम भरण्यास फार वेळ लागला असता. हे सर्व टाळण्यासाठी रोबोटिक सर्जरीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व तपासण्या व ऑपरेशन योग्य झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

यांनी केली शस्त्रक्रिया
या रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी युरोलॉजी विभागाचे डॉ. एस. पी. कांकलिया डॉ. व्ही. पी. साबळे, डॉ. वी. पी. सावंत, डॉ. सुनील म्हस्के, डॉ. हिमेश गांधी, डॉ. दीपक माने, डॉ. अभिरुद्रा मुळे, डॉ. मेहुल सिंह तसेच निवासी डॉक्टर्स आणि भूल तज्ज्ञ विभागाचे डॉ. पी. एस. गरचा, डॉ. शीतल व डॉ. भूषण यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.