भुसावळ । प्रत्येक पेट्रोल पंपावर नियमानुसार स्वच्छता गृह, ग्राहकांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहनाच्या चाकात मोफत हवा भरण्याची सुविधा पुरविणे क्रमप्राप्त आहे. पण, शहरासह शहरानजीकच्या अनेक पेट्रोलपंपावर यातील अनेक सुविधा केवळ नावालाच शिल्लक असल्याचे चित्र आहे. परिणामी, योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
अंमलबजावणीसाठी अधिकार्यांची नेमणूक
पेट्रोलीयम विभागातर्फे सर्वच पेट्रोलपंप संचालकांसाठी नियम लावण्यात आले आहे. नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित विभागांतर्गत अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, पेट्रोलपंप संचालकांनी शासनाचे नियम गुंडाळून ठेवल्याचेच बघावयास मिळते.
नागरिकांना योग्य सुविधा देणे गरजेचे
शहरातील अनेक पेट्रोल पंपावरील हवा भरण्याचे यंत्र नादुरुस्त असल्याचे वाहनचालकांना सांगण्यात येते. तर काही ठिकाणी पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृह नागरिकांसाठी नाहीच असे कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांकडून सांगितले जात असल्याने विविध प्रश्न उपस्थित होते आहेत. पेट्रोल पंपावर ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता पेट्रोलपंप संचालकांची नागरिकांना योग्य सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे.
अग्नीशमन यंत्रणाच नाही
पेट्रोल पंपावर गेले असता याबाबत ग्राहकही फारशी चौकशी करताना दिसत नाही. प्रतिबंध असताना पेट्रोलपंपावर कार्यरत असलेला कर्मचारी मोबाईलचा वापर करतो. त्यामुळे अनुचित प्रकाराला आमंत्रण मिळत आहे. काही पेट्रोलपंपावर अग्निशमन यंत्र, वाळूने भरलेल्या बादल्या असल्या तरी काही ठिकाणी हे साहित्यच नसल्याचे दिसते. त्यामुळे एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसून पेट्रोल पंप संचालकांनी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे.