शहरातील प्लास्टीक कचरा ठरतोय प्रदुषणाला कारणीभूत

0

भुसावळ । शहरात कॅरीबॅग निर्मूलनासाठी पालिकेने प्रयत्न केले, मात्र या प्रयत्नांना यश आलेले नाही. कॅरीबॅग विक्रेत्यांना तंबी आणि किरकोळ कारवाईनंतरही 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगचा सर्रास वापर केला जात आहे. यामुळे आता विक्रेत्यांवर व्यापक कारवाई आणि वापरकर्त्यांना प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे. तसेच हा कचरा जाळल्यामुळे प्रदुषण वाढीस लागत आहे.

रस्ते, गटारींमध्येही साचला कॅरीबॅगचा खच
पर्यावरणाचा र्‍हास थांबवण्यासाठी शासन आणि सर्वोच्च न्यायालयाने प्लास्टिक कॅरीबॅग वापरणार्‍यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शहरात पावलना- पावलावर प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. किरकोळ खरेदीतही कॅरीबॅगचा वापर केला जातो. यामुळे शहरातील रस्ते, गटारींमध्येही आता प्लास्टीकच्या कॅरीबॅगचा खच साचला आहे.

नागरिकांनी वापर करणे टाळावे
शहरातील मोकळ्या जागा, मैदाने, नदी, नाले, रस्त्यांच्या दोन्ही बाजू आदी सर्वच ठिकाणी प्लास्टिकचा कचरा अधिक प्रमाणात दिसून येतो. अंतर्गत भागांतील छोट्या गटारींची स्वच्छता नियमित वेळेत होत नाही. यामुळे नाल्यांमधील सांडपाणी तुंबल्याने अस्वच्छता वाढते. शहरातील बलबलकाशी नाल्यात तर वर्षानुवर्ष कॅरीबॅग अडकून नैसर्गिक वहन क्षमता कमी झाली आहे. पालिकेकडून विक्रेत्यांवर धडक कारवाई होत नाही, आणि नागरिकांकडूनही वापर थांबत नाही. यामुळे ही विदारक स्थिती कायम आहे.

आरोग्यास ठरतेय बाधा
शहरात होत असलेल्या कचर्‍याच प्लास्टीक पिशव्यांचा समावेश अधिक असतो. तसेच हा कचरा हवेमुळे शहरात फैलावत असल्याने स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांत आधी 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगचा वापर थांबला पाहिजे. यासाठी आता पालिका, सामाजिक संस्था आणि सर्वांत जबाबदार घटक असलेल्या नागरिकांनी एकत्र येवून प्रयत्न करणे आवश्यक आहे. पालिका प्रशासनाला शहरात स्वच्छतेसाठी सर्वाधिक निधी खर्च करावा लागतो. दररोज संकलीत होणार्‍या 90 टन कचर्‍यापैकी निम्मे प्लास्टीक कचरा जमा होतो. प्लास्टीक कचर्‍याचे विघटन होत नाही. यामुळे खेडी रोडवरील डपींग ग्राऊंड आणि महामहार्गाच्या कडेने टाकण्यात आलेला कचर्‍याचे विघटन होत नाही. या कचर्‍याला आग लावल्याने परिसरात धुरामुळे दुर्गंधी फैलावून आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.