सोफ्यांचे कापड, पडदे, कारपेट, फोमच्या गाद्यासह साहित्य खाक ; आगीचे कारण अस्पष्ट
जळगाव- शहरातील खान्देश कॉम्प्लेक्स परिसरातील दिनेश पुरूषोत्तम पटेल यांच्या भाडे तत्ववारील फर्निशिंगच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याची घटना 7 रोजी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास घडली. या आगीत गोदामातील सोफ्यांचे कापड, पडदे, कारपेट, फोमच्या गाद्या आदी साहित्य खाक झाले असून आठ ते दहा लाखांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त होत आहे.
शहरातील एस.एम.आय.टी कॉलेज परिसरातील भिकमचंद जैन नगरात दिनेश पुरुषोत्तम पटेल हे कुटुंबांसह राहतात. रेल्वे स्टेशन परिसरातील खान्देश मिल कॉम्प्लेक्समध्ये त्यांच्या मालकीचे ओम फर्निशिंग नावाचे दुकान आहे. दुकानात सोफ्यांचे कापड, पडदे, कारपेट, फोमच्या गाद्या आदींची विक्री केली जाते. या कामात पटेल यांना त्यांचा मुलगा प्रतिक व लहान भाऊ योगेश पटेल हे मदत करतात. दुकानासाठी आवश्यक सामान ठेवण्यासाठी पटेल यांनी दुकानाच्या समोरच्या बाजूस रस्त्यापलीकडे चंदन हॉटेलच्या बाजूला शिवाजी सरादे यांच्या मालकीचे गोडावून भाडे तत्वावर घेतले आहे. 6 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास गोडावून मधून कामगारांनी दुकानात लागत असलेला माल काढला व गोडावून बंद केले. यानंतर नेहमीप्रमाणे सर्व दुकान बंद करुन घरी निघून गेले.
तब्बल तीन तासानंतर आग आटोक्यात
7 रोजी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास गोडावूनला अचानक आग लागली. दिनेश पटेल यांना त्यांचे गोडावूनचे मालक शिवाजी सरोद यांनी फोनवरुन गोडावूनला आग लागल्याची माहिती दिली. पटेल व त्यांचा लहान भाऊ योगेश यांनी गोडावूनकडे धाव घेतली. मालक शिवाजी सरोदे यांनी पटेल यांना कळविण्यापूर्वी अग्निशमन कार्यालयाला माहिती दिली होती. त्यानुसार तत्काळ महानगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. तीन ते चार बंबांव्दारे पाण्याचा मारा केल्यानंतर तसेच अग्निशमन कर्मचार्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल तीन ते साडेतीन तासानंतर सकाळी 8 वाजता आग आटोक्यात आली.
आठ ते दहा लाखांच्या नुकसानीचा अंदाज
आग आटोक्यात आल्यावर गोडावूनमधील साहित्याची पाहणी केली असता, विक्रीसाठीचे पदडे, कारपेट, फोमच्या गाद्या, सोफ्यांचे कापड असा माल पूर्ण जळून खाक झाला होता. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. आगीत आठ ते दहा लांखांच्या नुकसानाचा अंदाज मालक दिनेश पटेल यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी दिनेश पटेल यांच्या खबरी वरुन शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.