शहरातील बेरोजगारांना रोजगार देणार

0

डॉ. रवींद्र चौधरी यांचे आश्‍वासन

गुजरातमधील व्यापार्‍यांना शहरात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही

नंदुरबार । मी एक व्यापारी माणूस असून राजकारण हा माझा धंदा नाही पण शहराच्या विकासाबरोबरच हजारो बेरोजगार तरुणांसाठी रोजगार देण्याचे व्हिजन ठेऊन राजकारणात प्रवेश केला आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपातर्फे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणार आहे अशा शब्दात हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना भूमिका स्पष्ट केली. आगामी नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या विरोधात डॉ. रवींद्र चौधरी यांनी दंड थोपटले आहे. यापूर्वी रवींद्र चौधरी यांनी पडद्याआड राहून राजकारणाचे सुत्र हलविले आहे. नंदुरबार बरोबरच अमळनेर मतदार संघात आपले लहान बंधू शिरीष चौधरी यांना अपक्ष आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी डॉ. चौधरी यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे.

मोठा प्रकल्प आणणार : शहरातील हजारो कुटुंबातील लोकांच्या हातांना काम मिळण्यासाठी एक मोठा प्रकल्प उभारणार असल्याचे सांगितले. दोन महिन्यात बेरोजगारांना काम देण्याचा विचार आहे. डॉ. चौधरी यांनी त्यांना नगराध्यक्ष बनविले तर गुजरातच्या व्यापार्‍यांची चर्चा करून त्यांना येथे आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शहराचा जो आता विकास दिसतोय तो त्यांनी अवघ्या अडीच वर्षात अमळनेरमध्ये केला असल्याचा दावा केला आहे. यावेळी आ.शिरीष चौधरी, विजय चौधरी, प्रवीण चौधरी,शाम मराठे,मोहन खानवाणी,केतन रघुवंशी आदी उपस्थित होते.

वेगळे करण्याची इच्छा
नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणारे डॉ.रवींद्र चौधरी यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता होती. ही भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मला नंदुरबारसाठी काहीतरी वेगळं करायचे आहे. रस्ते,वीज,गटारी या मूलभूत सुविधा तर होतच राहतील,पण त्यापलीकडे जाऊन बेरोजगारी दूर करण्याचे स्वप्न आहे.