शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा

0

राष्ट्रवादीचे अमित बच्छाव यांची मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकांना गेल्या कित्येक दिवसांपासून भटक्या, मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. वृत्तपत्रातून दिवसाआड कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. शहरात विविध भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हडीकर यांच्यांकडे केली आहे.

यंत्रणा अपुरी पडते आहे
बच्छाव यांनी दिलोल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील कुत्र्यांची संख्या वाढत आहे. भटक्या कुत्र्यांनी नागरीकांना चावा घेतल्याच्या घटना शहरात रोज घडत आहे. शहरात प्रचंड दहशत या कुत्र्यांनी माजवली असून, महापालिकेकडून लवकरात-लवकर भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न सोडवण्यासाठी उपाय-योजना राबविण्यात येणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस शहरातील विविध ठिकाणच्या तक्रारी येऊन देखिल महापालिका प्रशासनाला भटक्या कुत्र्यांचा त्रास हा प्रश्‍न महत्वाचा वाटत नाही का? शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न एकीकडे गंभीर होत असताना, हा प्रश्‍न सोडविण्यासाठी मनपाकडून ठोस उपाययोजना राबवल्या जात नसल्याचे चित्र आहे. शहरातील भटकी कुत्री पकडण्यासाठीची यंत्रणा अपुरी पडत असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या पाहता त्यांचे निर्बिजीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या तरी भागात या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे शासकीय रुग्णालय व मनपा दवाखान्यातील नोंदीवरून दिसते. यामध्ये लहान मुलांचे लचके कुत्र्यांनी तोडल्याच्या घटना जास्त आहेत. त्यामुळे लहान मुलांना कायमचे अपंगत्व आल्याच्याही घटना आहेत. काही मुलांचा मृत्यूही झाला आहे. या कुत्र्यांच्या बाबतीत नागरिक महापालिकेकडे तक्रार करतात, पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. नागरिकांकडून जास्त दबाव आला की काही कुत्री पकडली जातात. भटक्या कुत्र्यांचा विषय अतिशय संवेदनशील आहे. ही गंभीर समस्या मार्गी लागण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी बच्छाव यांनी केली आहे.