टेनिसपटूंना मिळणार शास्त्रोक्त प्रशिक्षण; हॉकी अॅकॅडमीची स्थापना
पिंपरी-चिंचवड महासभेने दिली मान्यता
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेर्फे नेहरूनगर येथे उभारलेले मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियमचा पुरेपुरे वापर व्हावा यासाठी महापालिकेने ऑलिपिंक हॉकीपटू विक्रम पिल्ले यांचे सहाय्य घेऊन पिंपरी-चिंचवड हॉकी अॅकॅडमीची स्थापना केली आहे. पिल्ले यांच्या प्रशिक्षणातून शहरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकीपटू घडविले जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला सोमवारी (दि.4)महासभेने मंजुरी दिली. पिंपरी महापालिकेने हे स्टेडिमय सन 1998 ला उभारले आहे. गेल्या 20 वर्षांत त्याचा वापर योग्य पद्धतीने न झाल्याने स्टेडियम अक्षरश: धूळखात पडून आहे. पालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र, त्याची कामगिरी राज्यापर्यंतच मर्यादित आहे. सुविधेचा वापर होऊन शहरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकीपटू निर्माण व्हावेत म्हणून पालिका हॉकीपटू विक्रम पिल्ले यांचे सहाय्य घेत आहे. त्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड हॉकी अॅकॅडमीची स्थापन केली जाणार आहे.
पिल्लेंचा पाच वर्षांचा करार
या संदर्भात पालिका व पिल्ले यांची हॉकी अॅकॅडमी 5 वर्षे कालावधीचा करारनामा करणार आहे. अॅकॅडमीशी समन्वय साधून प्रशिक्षण कालावधी वगळून मैदान खासगी संस्था व संघटनेला स्पर्धेसाठी दिले जाणार आहे. त्यासाठी जमा होणारे शुल्क पालिका स्वत:कडे ठेवणार आहे. नवोदित स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहता यावा, म्हणून दरवर्षी राज्य व राष्ट्रीयस्तर स्पर्धांचे आयोजन अॅकॅडमीतर्फे केले जाणार आहे. शालेय, महाविद्यालय आणि महापौर चषक स्पर्धेसाठी हे मैदान मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. पिल्ले यांचे मानधन, सहाय्यक प्रशिक्षक, मार्गदर्शक, सुरक्षारक्षक, पॉलिग्रास मैदान व स्वच्छतागृहांची साफसफाई, किरकोळ खर्च आदींचा खर्चांसाठी पालिका दरमहा 2 लाख रूपये अदा करणार आहे. मोठा खर्च निघाल्यास तो पालिका करणार आहे. मैदानाचा वापर हॉकी खेळाचे प्रशिक्षण व सरावाच्या व्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी करता येणार नाही. करारनामा 5 वर्षे मुदतीचा असून, त्यासाठी 1 लाख रूपये अनामत रक्कम जमा करून घेतली जाणार आहे. अॅकॅडमी सुरू झाल्यानंतर दरवर्षीचा अहवाल पालिकेस सादर करणे बंधनकारक आहे.
विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण
महापालिकेच्या शाळेतील 14, 17 व 19 वर्षांखालील मुले व मुलींच्या प्रत्येकी 25 विद्यार्थी खेळाडूंना आणि दत्तक योजनेत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातून त्याचा संघ निवडला जाणार आहे. त्यांना हॉकी स्टिक, बॉल, शूज, स्पोर्ट्स किट पालिका पुरविणार आहे. प्रशिक्षणाची वेळ दररोज सकाळी 7 ते 10 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 6 अशी असणार आहे. अॅकॅडमीच्या वतीने पिल्ले स्वत: प्रशिक्षण देणार आहेत. ते अनुभवी सहाय्यक प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहेत. तसेच, खासगी शाळा व महाविद्यालयाच्या खेळाडूंनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हे देखील वाचा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने शहराच्या विविध भागांत दहा लॉन टेनिस कोर्ट चालविली जातात. त्यापैकी पाच ठिकाणी भारतीय टेनिस टिमचे प्रशिक्षक नंदन बाळ हे शहरातील 50 खेळाडूंना टेनिसचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावला (सोमवारी)झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या क्रीडा विभागाअंतर्गत शहराच्या विविध दहा ठिकाणी टेनिस कोर्ट चालविली जातात. यामध्ये निगडी प्राधिकरणातील गणेश तलावानजीक आणि बाहुबली व्यायामशाळेजवळ सेक्टर क्रमांक 25 तर सेक्टर क्रमांक 26 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस टेनिस कोर्ट चालविली जातात. तसेच चिंचवडगाव, मोहननगर, इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, मोशी प्राधिकरण स्पाईनरोड येथील सेक्टर क्रमांक 4, महात्मा फुलेनगर, कासारवाडी आणि सांगवी अशा एकूण दहा ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
प्रशिक्षक नेमणे शक्य नाही
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेनिसपटू निर्माण करण्यासाठी अशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या महापालिकेला या दहा ठिकाणी प्रशिक्षक नेमणे शक्य नाही. त्यामुळे ज्या खेळाडूंना सराव करायचा आहे, ते सर्वजण वर्गणी काढून प्रशिक्षकाकडून टेनिसचे धडे गिरवत आहेत. त्यामुळे लॉन टेनिस प्रशिक्षण केंद्र सुरु करणे महत्त्वाचे असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे मत बनले आहे. भारतीय टेनिस संघाचे प्रशिक्षक असलेले नंदनबाळ टेनिसचे धडे देणारी क्रीडा संस्था चालवतात. पुणे शहरातील फर्ग्युसन महाविद्यालय, स.प. महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ते खेळाडूंना टेनिसचे धडे देत आहेत. शहरातील दहा टेनिस कोर्टपैकी मोहननगर, प्राधिकरण, चिंचवडगाव तसेच इंद्रायणीनगरमधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल आणि महात्मा फुलेनगर या पाच ठिकाणी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना कमी शुल्कात प्रशिक्षण
महापालिका शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीतील एकूण 50 विद्यार्थ्यांना टेनिस क्रीडा प्रकारातील बेसिक, इंटरमिडीएट आणि अॅडव्हान्स हे तीन प्रकारचे प्रशिक्षण केवळ दरमहा 100 रुपये प्रशिक्षण शुल्क आकारून देणे बंधनकारक आहे. या सर्व खेळाडूंना रॅकेट, शूज व किट महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून पुरविण्यात येणार आहे. मात्र, अन्य विद्यार्थी खेळाडूंकडून बेसिक ट्रेनिंगसाठी दीड हजार रुपये, इंटरमिडीएटसाठी अडीच हजार रूपये तर अॅडव्हान्स ट्रेनिंगसाठी साडे तीन हजार रुपये शुल्क आकारणीस महापालिका प्रशासनाकडून परवानगी दिली जाणार आहे. याकरिता महापालिकेकडून या संस्थेच्या प्रशिक्षकांना कोणतेही मानधन दिले जाणार नसून, ती जबाबदारी संस्थेची असणार आहे.
देखभालीची जबाबदारी संस्थेची
या पाचही टेनिस कोर्टवर महापालिकेचा मालकी हक्क असणार आहे. मात्र, या संस्थेशी करारनामा केल्यानंतर या सर्व टेनिस कोर्टवर सुरक्षा रक्षक, काळजीवाहक, प्रशिक्षक यांची नेमणूक व वेतन व मानधनाची जबाबदारी संस्थेची असणार आहे. याशिवाय या कोर्टची साफसफाईची जबाबदारी देखील या संस्थेची असणार आहे. महापालिका हद्दीतील विद्यार्थी खेळाडूंना सरावासाठी बॅच उपलब्ध करुन देणे बंधनकारक असून एका तासाच्या बॅचकरिता कमाल 50 रुपये शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारू नये, असे या करारनाम्यात नमूद आहे.