शहरातील ममता हॉस्पीटल फोडले

0

जळगाव । मेहरुण मधील एका महिलेची प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याची घटना दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली. महिलेच्या मृत्यूस डॉक्टरांचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईकांना संबधीत डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हा रुग्णालयात केली. यानंतर मात्र, संतप्त नातेवाईकांनी ममता हॉस्पीटलकडे आपला मोर्चा वळवत हॉस्पीटलची तोडफोड केली. दरम्यान, महिलेच्या नातेवाईकांनी पैशांच्या मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर नातेवाईकांनी हॉस्पीटलची तोडफोड केल्याचे डॉक्टरांचे म्हणने होते. यानंतर रात्री 8.30 वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत तोडफोड करणार्‍यांविरूध्द तक्रार दाखल केली. यावेळी मास्टर कॉलनी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर पोलिसांचा ताफाही घटनास्थळी होता.

उमेरा शेख हे मयत महिलेचे नाव आहे. मेहरुण परिसरातील मलिकनगरमध्ये मोहीम शेख ईस्माईल पिंजारी(रा. बाम्बे बेकरीजवळ) हे पत्नी उमेरा शेख (वय 27) यांच्यासह मोनीस व उमेद (वय 7) या जुड्या मुलांसह आयान (वय 3) यांच्यासोबत राहतात. उमेरा शेख ही गर्भवती असल्याने त्यांच्यावर मास्टर कॉलनी परिसरातील ममता हॉस्पीटलचे डॉ. शाहीद खान व डॉ. रुक्साना खान यांच्याकडे उपचार सुरु होते. सकाळी 10 वाजेच्या सुमारास उमेरा यांची नॉर्मल प्रसुती झाली. एका गोंडस मुलाला त्यांनी जन्म दिला. यानंतर काहीवेळा त्यांची प्रकृती खालाविली. रक्तस्त्राव होत असल्याने डॉ. खान दाम्पत्यांनी उमेरा यांचे नातेवाईक हमीदा निसार पिंजारी, जाबीर शेख पिंजारी, शरीफ शेख यांना घटनेबाबत माहीती दिली. यावेळी रक्तस्त्राव का होत आहे याचे निदान करता येत नसल्याने अ‍ॅपेक्स हॉस्पीटलमध्ये हलविण्याचा सल्ला डॉ. खान यांनी मयत महिलेच्या नातेवाईकांना दिल्याचे मयत महिलेच मामा जाबीर पिंजारी यांनी सांगितले. अ‍ॅपेक्स हॉस्पीटल येथे उमेरा यांना पाच रक्ताच्या पिशव्या लावण्यात आल्यात. मात्र त्यांचा उपचारादरम्यान दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. सुमारे दीड तासानंतर मृत्यू बाबत माहितीची दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हद्दीच्या वादामूळे तक्रारदाराची पायपीट
प्रसुती नंतर महिलेचा मृत्यू झाल्याने न्याय मिळविण्यासाठी महिलेचे मामा जाबीर पिंजारी हे रामानंदनगर, जिल्हापेठ यानंतर एमआयडीसी अशी पायपीठ करावी लागली. अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरु होते.

नस कापल्याचा नातेवाईकांचा आरोप
प्रसुतीनंतर डॉ.रुक्साना खान यांनी मयत महिलेच्या नातेवाईकांना सोनोग्राफी करण्यासाठी सांगितले. सोनोग्राफी केल्यानंतरही रक्तस्त्राव होत असल्याचे कारण समजले नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तसेच उमेरा यांची प्रसुती नॉर्मल झाली. बाळही व्यवस्थीत आहे. मात्र उमेराचे रक्त थांबत नाही. त्यामूळे डॉक्टरांनी प्रसुतीदरम्यान एखादी नस कापली असेल आणि उपचारासाठी हलगर्जीपणा करीत दीड तासाने उमेरा मृत्यू झाल्याची माहीती दिली. हा सर्व प्रकार संशयास्पद असुन ममता हॉस्पीटलवरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयत महिलेचे मामा जाबीर शेख पिंजारी यांनी केली.

हॉस्पीटलची केली तोडफोड
उमेराच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. यानंतर रात्री 8 वाजेच्या सुमारास काट्याफाईल परिसरातील काही जणांनी रिक्षाने येवुन ममता हॉस्पीटची तोडफोड केली. यात पल्लवी समाधान पाटील ही रुग्ण महिला देखील जखमी झाली. कॉम्युटरसह वाहनांची काचा तसेच प्रवेशद्वाराचे काच फोडून अश्या सुमारे 80 हजारापेक्षा जास्तीचे नुकसान झाले. यामूळे परिसरात तणावाची परिस्थीती निर्माण झाली होती. ममता हॉस्पीटलवर हल्ला झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनीटात आयएमएचे डॉ.विश्‍वेश अग्रवाल, डॉ. राजेश पाटील, डॉ. अनिल पाटील यांच्यासह आयएमएचे आजी-माजी पदाधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. ममता हॉस्पीटलच्या हल्याचे निषेध करीत आयएमएच्या पदाधिकार्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली