शहरातील महिला मंडळांतर्फे झेड.पी. अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांचा सत्कार

0

एरंडोल । शहरातील सर्व समाजातील महिला मंडळांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दत्त कॉलनीमधील सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अहिराणी लेखिका श्रीमती शकुंतला पाटील रोटवदकर होत्या. सर्व महिला मंडळांनी एकत्र येवून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उपस्थित पाहुण्यांनी स्वागत केले.कार्यक्रमास राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी नऊवारी साड्या परिधान केल्या होत्या. तसेच त्यांनी सादर केलेली आखाजीची गाणी, नाटिका व गौराईच्या गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सोळा महिला मंडळांनी एकत्रितपणे कार्यक्रमाचे केले आयोजन
शहरातील सर्व समाजातील सोळा महिला मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी एकत्रितपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी सर्व महिला मंडळांनी एकत्र येऊन सत्कार केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सर्व महिलांनी संघटीत होऊन महिलांची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन केले. जिल्हा परिषद व शासनाच्या वतीने महिला मंडळांना सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, साळी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभना साळी यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ अहिराणी लेखिका शकुंतला पाटील यांनी अहिराणी गीत सादर करू आखाजी सणाचे महत्व सांगितले. कीर्ती जोगी व रेणुका जोगी यांनी कार्यक्रमात वेगळी वेशभूषा केली होती. राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या सदस्यांनी आखाजी, गौराईच्या गाण्यांवर पारंपारिक नृत्य सादर केले. माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव यांनी प्रास्तविक केले. वंदना पाटील यांनी आभार मानले.

या मंडळांनी घेतला सहभाग
साळी समाज, गणेश भजनी मंडळ, मानसी महिला मंडळ, शारदोपासक महिला मंडळ, परदेशी समाज महिला मंडळ, हेडगेवार महिला मंडळ, वाणी समाज महिला मंडळ, भावसार समाज महिला मंडळ, सर्वधर्म संभाव महिला मंडळ, राजस्थानी महिला मंडळ यांच्यासह शहरातील सर्व महिला मंडळांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास शोभा साळी,चंद्रकला जैन, शशिकला मानुधाने, उषा पाटील, संध्याताई भोसले, नगरसेविका वर्षा पाटील, प्रतिभा पाटील, आरती ठाकूर, शशिकला जगताप, इंदिरा पाटील, आरती पाटील, ज्योतिका पाटील, हिराबाई पाटील, शिला पाटील, साधना पाटील, सपना वानखेडे, कविता देशमुख यांचेसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.