जळगाव । येथील मराठी प्रतिष्ठान व उद्योजकांतर्फे मुख्य रस्त्यांवर गतीरोधक असलेल्या ठिकाणी सुचना फलक उभे करण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून त्याचा प्रारंभ आज सकाळी शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस समोर करण्यात आला. यावेळी महापौर नितिन लढ्ढा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, मनपाचे अभियंता सुनिल भोळे यांच्यासह मराठी प्रतिष्ठानचे तसेच ‘साईमत’चे संपादक प्रमोद बर्हाटे, विजयकुमार वाणी, अॅड.जमील देशपांडे, रॉयल पॅलेसचे प्रदीप आहुजा, नवजीवन सुपरशॉपचे अनिल कांकरिया, प्रभा मोटर्सचे किरण कासार, हेमंत भोकरडोळे यांची विशेष उपस्थिती होती.
संभाव्य अपघातांना आळा बसणार
मराठी प्रतिष्ठानतर्फे शहरातील सर्व भागात सर्वेक्षण करण्यात येवून त्यातील अतिवर्दळीच्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात 20 ठिकाणी गतीरोधक असल्याच्या ठिकाणी सुचना फलक लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरातील अनेक उद्योजकांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. गतीरोधक असलेल्या ठिकाणी सुचना फलक नसल्यामुळे अनवधानाने दुचाकी व चारचाकी उधळतात. प्रसंगी लहान-मोठे अपघातही होत असतात. या उपक्रमामुळे संभाव्य अपघातांना आळा बसणार आहे. शहरातील रिंगरोड, गणपती नगर, बॉम्बे बेकरी, लढ्ढा फार्म हाऊस आदी भागात हे सुचना फलक उभारण्यात येणार असल्याची माहिती मराठी प्रतिष्ठानचे विश्वस्त अॅड. जमील देशपांडे यांनी दिली.