शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आजपासून मोहीम

0

महापालिकेच्या पथकासह राहणार पोलीस बंदोबस्त

जळगाव– शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून उद्या दि.14 पासून धडक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. तसेच शामराव नगरात मनपाच्या खुल्या जागेवर असलेल्या पाच दुकानांचे देखील अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुभाष चौक, टॉवर चौकासह मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. परिणामी पार्कींग आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी त्यांच्या कार्यकाळात तहसील कार्यालयाजवळील, न्यायालयासमोरील अतिक्रमण काढले होते. आता पून्हा अतिक्रमण वाढले असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आल्याने प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.

या रस्त्यांवरील काढणार अतिक्रमण

महाबळ ते शनिपेठ पोलीस चौकीपर्यंत,नेहरु चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत,अण्णाभाऊ साठे पुतळा ते स्वातंत्र्य चौक ,एम.जे.कॉलेजर्पंत,शास्त्री टॉवर ते अंजिठा चौफुली, घाणेकर चौक ते बेंडाळे चौक,बेंडाळे चौक ते इच्छादेवी चौक,सेंट टेरेसा स्कूलपर्यंत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे.

’त्या’ पाच दुकानांवरही होणार कारवाई

स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा यांना मिळालेल्या माहितीनुसार नगररचना विभागाने शामराव नगरात खुल्या जागेची तपासणी केली. त्यात महापालिकेच्या जागेवर पाच दुकाने उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. नगररचना विभागाकडून कारवाईसाठी अतिक्रमण विभागाला आदेश करण्याची टिपणी आयुक्तांकडे सादर करण्यात आली असून लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.