शहरातील रखडलेल्या विकासकामांना मिळणार चालना!

0

कामे न करणार्‍यांवर कारवाई करणार : महापौर भारती सोनवणे

जळगाव – शहराच्या विविध प्रभागातील विकासकामे गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या स्थितीत आहे. ठेकेदारांची अडचण समजून घेत त्यांना मक्त्याची रक्कम काम झाल्यावर मिळवून देण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असल्याचे महापौर भारतीताई सोनवणे यांनी आश्वासित केले. दरम्यान, महापौरांच्या सूचनेनुसार सर्व ठेकेदार पुन्हा काम सुरू करण्यास तयार झाले असल्याने जळगावातील कामांना पुन्हा चालना मिळणार आहे. चांगले आणि योग्य काम करणार्‍यांच्या पाठीशी मनपा प्रशासन आणि पदाधिकारी राहतील आणि वेळेत काम न करणार्‍यांना दंड देखील केला जाईल असा इशारा देखील महापौरांनी दिला.

शहराच्या विकासासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक महापौर भारती सोनवणे यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता आपल्या दालनात आयोजित केली होती. बैठकीला नगरसेवक कैलास सोनवणे, मुख्य लेखा परीक्षक संतोष व्हाहूले, मुख्य लेखाधिकारी कपील पवार, शहर अभियंता सुनील भोळे, प्रभाग अधिकारी सुशील साळुंखे, अतिक्रमण विभाग अधीक्षक एच.एम.खान तसेच शहरातील विविध विकासकामांचा ठेका घेतलेले मक्तेदार उपस्थित होते.

जळगाव शहर मनपाला मिळणार 25 कोटींचा विशेष निधी रोखण्यात आल्याने मक्तेदारांनी बिले मंजूर होणार नाही या भीतीपोटी कामे थांबविली होती. महापौर भारतीताई सोनवणे यांनी सर्व मक्तेदारांशी चर्चा करून शासन 25 कोटींचा निधी देण्याबाबत सकारात्मक असून गाळ्यांच्या करवसुलीतून किंवा इतर महसुलातून कामे पूर्ण झाल्यावर बिलाची रक्कम मक्तेदारांना अदा केली जाईल. त्यासाठी मनपा प्रशासनाने नियोजन केले असल्याचे महापौर यांनी सांगितले.

..तर 10 टक्के दंड आकारणार
शहरात सुरू असलेल्या विकासकामांना उशीर झाल्यास 1 ते 10 टक्के दराने दंड आकारण्याचा अधिकार मनपा प्रशासनाला आहे. सध्या मक्तेदारांकडून 1 टक्का दराने दंड वसूल केला जात आहे जर मक्तेदार त्वरित काम सुरू करणार नसतील तर 10 टक्के दराने दंड वसूल करण्यात येईल असा इशारा देखील महापौर भारतीताई सोनवणे यांनी दिला.

कामे पुन्हा होणार सुरू
महापौर भारतीताई सोनवणे यांनी बोलावलेल्या बैठकीला 19 ठेकेदार उपस्थित होते. बैठकीत सर्व ठेकेदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कामे पुन्हा सुरू करण्यास तयारी दर्शवली आहे त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी सुरू असलेली नाल्यावर पूल बांधणे, संरक्षक भिंती उभारणे, गटारी बांधणे अशा कामांना पुन्हा गती मिळणार आहे.