शहरातील रस्त्यांना आले तलावाचे स्वरुप

0

भुसावळ । दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण होण्यास सुरुवात झाली आहे. लहानमोठ्या खड्डयांमधील खडी बाहेर येऊन त्या जागेवर सतत वाहनांची आदळआपट सुरु असल्याने लहान खड्डयांनी मोठे रुप घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातल्या त्यात वरणगाव रस्ता व मामाजी टॉकीज रस्त्याची अवस्था तर व्यक्त करणे कठीण, येथून वाहन चालकांना खो- खो खेळत येजा करावी लागत आहे. अमृत योजनेअंतर्गत खोदकाम होऊन जलवाहिनी टाकली जाणार असल्याने डांबरीकरण केल्यास रस्ते खराब होतील त्यामुळे रस्त्यांचे काम केले जाणार नाही. किमान भराव टाकून खड्डे बुजविण्याची तसदी देखील पालिकेतर्फे घेतली जात नसल्यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पावसामुळे डांबरी रस्त्यावरील खडी उखडून येत आहे. त्यामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढत असून शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर डबके साचले आहे. येत्या दोन दिवसात हे खड्डे बुजवले नाहीतर सततच्या येजा करणार्‍या वाहनांमुळे हे खड्डे मोठा आकार घेतील. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे खड्डे डागडुजीची कामे तातडीने सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

तातडीने बुजवावे खड्डे
शहरातील बसस्थानक परिसर, मामाजी टॉकीज रस्ता, वरणगाव रस्ता, बंब कॉलनी परिसरात रस्त्यांची तर अतिशय दयनिय अवस्था झालेली आहे. काही ठिकाणी रस्ता उंच तर काही ठिकाणी सखल झाल्याने या भागात अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. तसेच जामनेर रोड, हंबर्डीकर चौक, स्टेशन रोड आदी रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरूवात झाली असताना पालिकेने तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश द्यावेत. यास उशिर झाला असता खड्ड्यांची संख्या वाढत जाणार आहे.

नुतनीकरण सोडा, किमान खड्डे तर बुजा
अमृत योजनेतून पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकताना रस्त्यांचे खोदकाम होणार आहे. त्यामुळे आत्ताच रस्त्याचे काम केल्यास खोदकामामुळे नुकसान होऊ शकते याच कारणामुळे नवीन रस्त्यांच्या कामांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे हे रस्ते दुरुस्त होण्याची शक्यता धूसर असून पावसाळ्यात वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र नगरपालिकेने या खड्ड्यांमध्ये किमान खडीचा भराव टाकून ते बुजविण्याची आवश्यकता आहे. मामाजी टॉकीज रोड, लोखंडी पूल ते हंबर्डीकर चौकापर्यंतचा मार्ग, मॉर्डनरोड या प्रमुख रस्त्यांची दैनावस्था झाली आहे.

तात्पुरती दुरुस्ती करावी
मामाजी टॉकीज रस्ता नगरोत्थान योजनेत समाविष्ठ केला होता. मात्र, शहरात अमृत योजनेतील पाइपलाइनसाठी रस्त्यांचे खोदकाम करावे लागणार आहे. त्यामुळे आता हा रस्ता तयार केल्यास त्यावरील खर्च वाया जाईल. त्यामुळे पाइपलाइन टाकल्यावर त्याचे काम होईल. तसेच वरणगाव रस्त्याची देखील हिच व्यथा असून या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वर्षभराचा कालावधी लागणे शक्य असल्याने यंदाच्या पावसाळ्यातही त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांवर अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता जागोजागी पडलेले खड्डे बुजविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने किमान खडी-मुरुम टाकून तात्पुरती रस्ता दुरुस्ती केल्यास वाहनचालकांना दिलासा मिळू शकतो.