पुणे । शहराच्या विकास आराखड्यातील रिंग रोड (एचसीएमटीआर) प्रकल्पाला महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मंजुरी मिळणार असून, या संबंधीचे सादरीकरण शुक्रवारी समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रकल्पाला मंजुरी देऊन लगेचच तो मुख्यसभेत पाठवण्यात येईल.
गेल्या 25 वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला गती देण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या असून, यासंदर्भात येत्या 8 दिवसांतच निर्णय घेतला जाणार आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या लक्षात घेऊन पुण्यातही असा स्वतंत्र वर्तुळाकार मार्ग असावा, अशी संकल्पना मांडण्यात आली. मात्र भूसंपादनामध्ये हा विषय अडकला होता. या प्रकल्पातील 95 टक्के रस्ता या शहराच्या जुन्या हद्दीतून जातो. त्यामुळेच येथे भूसंपादन होणे अवघड आहे. त्यामुळेच या कामाला गती मिळाली नव्हती. पीएमआरडीए’नेही अन्य गावांना जोडणारा रिंग रस्ता तयार केला असून, येवलेवाडी जवळ हे दोन्ही रिंगरोड एकमेकांना मिळतात. त्यामुळे यातील काही भाग एकत्रितच होणार असल्याने त्याविषयीची माहिती येत्या शुक्रवारी होणार्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सादरीकरणाद्वारे मिळणार आहे. रिंग रोड मंजूर करून घेण्याबाबत आदेश आल्याने शहर सुधारणा समितीने त्याचे काम वेगाने सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच तो मंजूर होऊन भूसंपादनाच्या कामालाही वेग येणार आहे.
येत्या शुक्रवारी समितीसमोर रिंग रोडला मंजुरी दिली जाणार आहे. त्यानंतर लगेच शहर सुधारणा समिती मुख्यसभेसमोर याचे सादरीकरण करणार आहे. यात कोणताही विलंब होणार नाही.
– महेश लडकत,
अध्यक्ष, शहर सुधारणा समिती